

Nashik Politics : नाशिकच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. नाशिक महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी आज शुक्रवार( दि.6) निवडणूक होत असून भाजपकडे बहुमतापेक्षा अधिक सदस्यसंख्या असतानाही भाजपने शिवसेना शिंदे गटाला सत्तेत सहभागी करुन घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. उपमहापौरपद शिवसेनेला देण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.
भाजपकडे १२२ पैकी ७२ नगरसेवक आहेत. बहुमतापेक्षा दहा नगरसेवक भाजपकडे जास्त आहेत. अशा परिस्थितीत आम्हाला कुणाच्या कुबड्या नको अशी भूमिका सुरुवातीला मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केली होती. भाजपकडून महिला सर्वसाधरण गटातून महापौरपदासाठी हिमगौरी आहेर आडके यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांच्या निवडीची औपचारिकता पार पडणार आहे. तर उपमहापौरपदासाठी भाजपने मच्छिंद्र सानप यांचा अर्ज भरला होता, त्यांचा अर्ज माघारी घेतला जाणार असल्याचे कळत असून त्यांच्या जागी शिवसेनेचे विलास शिंदे यांना उपमहापौरपदासाठी मतदान करण्याचा व्हीप भाजपच्या गटनेत्यांनी आपल्या नगरसेवकांना बजावल्याचे समजत आहे.
पहिले शिवसेना-भाजप युती होणार की नाही हे ठरलेलं नव्हतं. मात्र आज निवडणुकीच्या दिवशी सकाळी शिवसेनेला सत्तेत सहभागी करुन घेण्याचा निर्णय जवळपास झाल्याचे कळत आहे. भाजपचे नगरसेवक महापालिकेत दाखल झाले आहेत. सकाळी ११ वाजता बरोबर निवणुकीला प्रारंभ होणार आहे. सकाळी ११.०५ ते ११.२० नगरसचिवांकडून विषय पत्रिकेचे वाचन होईल. ११.२० ते ११.२५ महापौरांची निवड प्रक्रिया होईल. ११.४५ ला निवडणूक प्रक्रिया व ११.५० वाजता वैध उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार आहेत.
नाशिकमध्ये भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली होती. तर शिवसेना व राष्ट्रवादीने मिळून एकत्र निवडणूक लढवली होती. भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले, ७२ नगरसेवक भाजपचे निवडून आले. तर शिवसेनेला २६ व राष्ट्रवादी कॉंग्रेसला ४ जागा मिळाल्या. निवडणुकीनंतर मात्र आता शिवसेनेला भाजप सोबत घेत आहे. त्यामुळे नाशिकमध्ये भाजपचा महापौर तर शिंदेंच्या शिवसेनेचा उपमहापौर राहणार आहे. भाजपच्या हिमगौर आहेर आडके या महापौर होतील तर शिवसेना शिंदे गटाचे विलास शिंदे उपमहापौर होतील. उपमहापौरपदासाठी शिंदेसेनेकडून विलास शिंदे यांच्याशिवाय प्रवीण तिदमे व राहुल दिवे यांनीही अर्ज दाखल केले होते. त्यांना माघार घ्यायला सांगितले जाऊ शकते.
दरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपसह शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि मनसे सत्तेत असतील असे दिसत आहे. तर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती ठाकरेंच्या शिवसेनेच्या पथ्यावर पडणार असून १५ नगरसेवक असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विरोधी पक्ष नेता होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपच्या हिमगौरी आडके महापौर तर उपमहापौर पदी शिंदेंच्या शिवसेनेचे विलास शिंदे उपमहापौर होणार आहे. दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेच्या सीमा पवार यांनी देखील महापौरपदासाठी अर्ज केला होता. त्यांनी माघार घेतल्यास निवडणूक बिनविरोध होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.