NMC committee election : नाशिक महापालिकेच्या महिला बालकल्याणसह शहर सुधारणा, वैद्यकीय साहाय्य व आरोग्य, विधी आणि शिक्षण या पाच महत्त्वाच्या समित्यांच्या सभापतिपदाच्या निवडणुकांसाठी नगरसचिव विभागाने विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे या निवडणुकांना मुहूर्त लागणार असून पुढील आठवड्यात या निवडणुका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महापौर हिमगौरी आडके यांनी गेल्या महिन्यात झालेल्या महासभेत या पाचही समित्यांवरील सदस्य नियुक्ती जाहीर केली होती. मात्र सदस्य नियुक्ती होऊनही सभापती पदाचा कार्यक्रम रखडला होता. अखेर आता पुढील आठवड्यात निवडणुका होण्याची शक्यता असून नऊ सदस्यीय पाचही प्रमुख विषय समित्यांवर स्पष्ट बहुमत असल्याने सर्व पाचही सभापतीपदे बिनविरोध मिळवण्याच्या हालचाली भाजपकडून सुरु आहेत.
पक्षीय संख्याबळानुसार सत्तारूढ भाजपचे सर्वाधिक सदस्य या समित्यांवर आहेत. ९ सदस्यांच्या प्रत्येक समितीत भाजपचे पाच, शिवसेनेचे दोन, तर शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य आहे.
विधी समितीत राष्ट्रवादी (अजित पवार गट) पुरस्कृत एका अपक्ष नगरसेवकाचा समावेश करण्यात आला आहे. सदस्य नियुक्तीचा ठराव महापौरांकडून प्राप्त झाल्यानंतर नगरसचिव विभागाने सभापती निवडीसाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव सादर केला. परंपरेनुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांच्या प्रतिनिधीच्या नियंत्रणाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडते.
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुदत दिली जाईल आणि माघारीची प्रक्रिया प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी होईल. एकापेक्षा अधिक अर्ज शिल्लक राहिल्यास मतदान घेतले जाईल, मात्र पाचही समित्यांमध्ये भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने या निवडणुका बिनविरोध होण्याची चिन्हे आहेत. शिवाय भाजपला मित्रपक्षाचे पाठबळ मिळण्याची देखील शक्यता आहे.
मात्र, भाजपकडून बिनविरोध निवडीचे प्रयत्न सुरु असले तरी, विरोधकांनी उमेदवारी कायम ठेवल्यास समितीतील संख्याबळानुसार मतदानाची प्रक्रिया पार पडेल. त्यामुळे निवडणूक बिनविरोध करण्याचा भाजपचा प्रयत्न यशस्वी होतो की विरोधक ऐनवेळी वेगळेच रंग भरतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.