NMC Approved Corporator: नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदाचे राजकारण टोकाला पोहोचले आहे. काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपशी हात मिळवणी केल्याने शिवसेना सावध झाली आहे. यावरून उद्या होणाऱ्या महासभेच्या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. नाशिक महापालिकेत काँग्रेसचे तीन नगरसेवक आहेत. या नगरसेवकांनी राजकीय भूमिका आणि सोयीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षासोबत गटन नोंदणी केली आहे. असे असले तरीही काँग्रेसचे नगरसेवक मात्र पडद्यामागे भाजपला मदत करीत आहेत.
महापालिकेतील सत्तेच्या माध्यमातून होणारी विकास कामे आणि निधी याचा वापर करीत भाजपने काँग्रेसच्या नगरसेवकांना मधाचे बोट दाखविले आहे. त्यामुळे स्वीकृत नगरसेवक नियुक्तीत संधी न मिळाल्याने नाराज काँग्रेस भाजपच्या गळ्याला लागली आहे. महापालिकेत 10 स्वीकृत नगरसेवकांमध्ये भाजपचे सहा आणि शिवसेना एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे पक्षाला प्रत्येकी दोन असे दहा नगरसेवक नियुक्त करण्यासाठी नावे जाहीर झाली आहे. मात्र ऐनवेळी भाजपने वेगळा डाव टाकत काँग्रेसच्या सुफी जीन यांच्यामार्फत भाजपच्या सुनील आडके यांची शिफारस केली.
काँग्रेस नगरसेवकांनी भाजप कार्यकर्त्याची स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिफारस केल्याने तो अकरावा नगरसेवक ठरला. महापालिका प्रशासनाने हा अर्ज फेटाळला आहे. मात्र त्यामुळे एकूण प्रक्रिया अडचणीत आणि वादात सापडली आहे. त्याचे निमित्त करून स्वीकृत नगरसेवक घोषणा लांबविण्याचा भाजपचा डाव असल्याची चर्चा आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाविरोधात काँग्रेस आणि भाजपच्या या युतीला उत्तर देण्यासाठी शिवसेनेने रणनीती आखली आहे. आधीच सावध झालेल्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे गटनेते केशव पोरजे यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आले आहे. स्वीकृत नगरसेवक प्रकरणी न्यायालयाद्वारे अडथळा येऊ नये यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे.
महापालिकेची महासभा उद्या (ता.२०) होणार आहे. यावेळी स्वीकृत नगरसेवक तसेच विरोधी पक्षनेता आणि सभागृह नेता या पदांची घोषणा अपेक्षित आहे. मात्र भाजप मधील पदासाठीची रस्सीखेच व राजकारण यामुळे ती लांबणीवर पडावी यासाठी एक गट कार्यरत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर देखील शुक्रवारी (या.२०) सुनावणी होणार आहे. एकतर्फी सुनावणी होऊ नये यासाठी शिवसेनेने कायदेशीर मार्गाचा अवलंब करीत भाजपला राजकीय शह देण्याची तयारी केली. त्यामुळे स्वीकृत नगरसेवक पदावरील राजकारण टोकाला पोहोचले आहे.