Girish Mahajan Pushes for Better Sports Infrastructure in Nashik Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik football ground : पालकमंत्री गिरीश महाजनांची किक, नाशिकमध्ये साकारणार फुटबॉलचे अत्याधुनिक मैदान

Nashik to Get National-Level Football Ground : कुंभमेळा नगरी नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून नाशिकच्या क्रीडा क्षेत्राला नवसंजीवनी देणारे राष्ट्रीय दर्जाचे फुटबॉलचे मैदान विकसित केले जाणार आहे.

Ganesh Sonawane

Nashik football ground : नाशिकच्या क्रीडा क्षेत्राला नवसंजीवनी देणारा आणि स्थानिक खेळाडूंच्या स्वप्नांना नवी दिशा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा नियोजन समितीअंतर्गत घेण्यात आला आहे. राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या विशेष पुढाकारातून आणि पाठपुराव्यामुळे नाशिक शहरातील राष्ट्रीय दर्जाचे अद्ययावत फुटबॉल मैदान विकसित करण्यास तसेच हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर रात्रीच्या सामन्यांसाठी अत्याधुनिक विद्युत झोत (हाय-मास्ट फ्लडलाईटस्) सुविधा उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे. हे फुटबॉल मैदान हे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या सर्व्हे नंबर 234, माने नगर, पंचवटी येथील 8 एकर जागेवर विकसित करण्यात येणार आहे.

गेल्या काही वर्षांत नाशिकने राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपटू, क्रिकेटपटू आणि विविध क्रीडा प्रकारातील खेळाडू घडविले आहेत. उच्च दर्जाच्या क्रीडा पायाभूत सुविधासाठी खेळाडूंना सरावासाठी मुंबई, पुणे यांसारख्या महानगरांकडे जावे लागत होते. आता पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारामुळे नाशिकमधील खेळाडूंना शहरातच स्थानिकस्तरावर उच्च दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध होणार आहेत.

नवीन फुटबॉल मैदानामध्ये उच्च दर्जाच्या लॉनसह योग्य ड्रेनेज सिस्टिम, पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा आणि मैदानाच्या मानक आकारानुसार आवश्यक सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. त्यामुळे खेळाडूंना नियमित व दर्जेदार सरावासाठी उत्तम मैदान उपलब्ध होईल. मैदानामुळे सामान्य व खडबडीत मैदानावर खेळताना होणाऱ्या दुखापतींचे प्रमाणही कमी होण्यास मदत होणार आहे. या सुविधेमुळे नाशिकमध्ये राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल स्पर्धा तसेच व्यावसायिक लीगचे आयोजन करणे शक्य होणार आहे.

आधुनिक क्रिकेटमध्ये दिवस-रात्र सामने आणि टी-२० फॉर्मेट लोकप्रिय आहे. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक हाय-मास्ट फ्लडलाइट्समुळे नाशिकच्या क्रिकेटपटूंना रात्रीच्या प्रकाशात सराव करण्याची सुविधा मिळणार आहे. नोकरी, शाळा व महाविद्यालय सांभाळणाऱ्या खेळाडूंनाही सायंकाळनंतर किंवा रात्री सराव करता येणार असल्याने त्यांच्या क्रीडा कौशल्याला अधिक वाव मिळेल. या सुविधेमुळे नाशिकमध्ये नाईट क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करणे शक्य होणार असून, स्थानिक खेळाडूंना आपले कौशल्य मोठ्या व्यासपीठावर दाखविण्याची संधी मिळणार आहे.

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून निर्माण होणाऱ्या या उच्च दर्जाच्या क्रीडा सुविधांमुळे नाशिकमध्ये राज्यस्तरीय स्पर्धांचे प्रमाण वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे बाहेरील शहरांतील खेळाडू, प्रशिक्षक व क्रीडाप्रेमी नाशिकमध्ये येतील. याचा सकारात्मक परिणाम स्थानिक पर्यटन, हॉटेल व्यवसाय तसेच वाहतूक व्यवस्थेवर होऊन नाशिकच्या अर्थकारणालाही चालना मिळणार आहे. तसेच उच्च दर्जाच्या मैदानांवर सराव केल्यामुळे नाशिकच्या खेळाडूंची शारीरिक क्षमता, खेळाची गती आणि तांत्रिक कौशल्य अधिक विकसित होण्यास मदत होईल. परिणामी आयपीएल, रणजी करंडक तसेच राष्ट्रीय फुटबॉल संघांत नाशिकच्या खेळाडूंची निवड होण्याचे प्रमाण वाढण्यास मदत लागेल.

नाशिकच्या क्रीडा विश्वाला नव्या शिखरावर नेण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दाखविलेली तत्परता आणि जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून देण्याचा घेतलेला धोरणात्मक निर्णय कौतुकास्पद आहे. “नाशिकमध्ये गुणवत्तेची कमतरता नाही, फक्त त्यांना योग्य व्यासपीठ आणि अद्ययावत सुविधांची गरज होती. ही सुविधा नाशिकच्या क्रीडा इतिहासात मैलाचा दगड ठरेल,” असा विश्वास क्रीडा संघटना व प्रशिक्षकांनी व्यक्त केला आहे. या अद्ययावत प्रकल्पांचे काम लवकरच सुरू होणार असून येत्या काळात नाशिकची महाराष्ट्राचे नवे ‘स्पोर्ट्स हब म्हणून ओळख निर्माण होईल, असा विश्वास जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती पाटील यांनी व्यक्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT