नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील नाईकवाडी येथे दिवसा बिबट्याने लहान मुलावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले.
परिसरातील नागरिकांनी धाडस दाखवत मुलाला बिबट्याच्या तावडीतून सोडवले.
या घटनेवर आमदार हिरामण खोसकर यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करत वनविभागावर टीका केली.
Hiraman Khoskar News : नाशिकसह राज्यात बिबट्यांचा नागरिकांवर हल्ला झाला नाही असा दिवस जात नाही. ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये त्यामुळे बिबट्याची दहशत वाढत आहे. इगतपुरी तालुक्यातील नाईकवाडी येथे दिवसा लहान मुलावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा गंभीररित्या जखमी झाला. परिसरातील नागरिकांनी त्याला बिबट्याच्या हल्ल्यातून सोडवले.
हा प्रश्न आता थेट विधानसभेत उपस्थित झाला असून राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर यांनी आपल्या मतदारसंघातील या घटनेचा उल्लेख करत वन विभागावर गंभीर ताशेरे ओढले आहेत. तसेच त्यांनी बिबट्यांचे हल्ले वन विभागाने गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
सकाळी आठला बिबट्या आढळल्याने त्याच मुलाने याची माहिती आमदारांना फोन करून माहिती दिली होती. आमदार खोसकर यांनी लागलीच वनविभागाशी संपर्क केला. मात्र वनविभागाकडून कोणतेही अधिकारी तिकडे फिरकले नाही. सकाळी अकराला बिबट्याने मुलावर हल्ला केला.
वनविभागाकडून बिबट्यांची तक्रार आल्यावर पिंजरा लावला जातो. त्या ठिकाणाहून बिबट्या पकडून दुसऱ्या जवळच्या भागात सोडला जातो. त्यानंतर बिबट्या मुक्त असतो. बिबट्याचे प्रजनन सुरळीत सुरू असल्याने त्यांची संख्या वेगाने वाढत आहे.
या संदर्भात वनविभाग गंभीर नसल्याने अनेक भागात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्याला दाट जंगलात आणि दूर अंतरावर सोडले पाहिजे. एकदा बिबट्या सोडल्यानंतर तो पुन्हा गावात किंवा मानवी वस्तीत सहसा येणार नाही अशी व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. राज्य सरकारने त्यात लक्ष घालावे अशी मागणी त्यांनी केली.
बिबट्याच्या प्रश्नावर नाशिक जिल्ह्यातील जवळपास सर्वच भागात समस्या निर्माण झाली आहे. अनेक गावांमधून नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. आमदार खोसकर यांनी या प्रश्नाचे गांभीर्य विधिमंडळात मांडले आहे. त्यामुळे आता तरी नाशिकच्या शेतकऱ्यांची बिबट्यापासून सुटका होते का? याची उत्सुकता आहे.
FAQs :
1. बिबट्याचा हल्ला कुठे झाला?
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील नाईकवाडी गावात ही घटना घडली.
2. हल्ल्यात कोण जखमी झाले?
दिवसा खेळत असलेल्या लहान मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले.
3. मुलाला कसे वाचवले गेले?
गावकऱ्यांनी धाडस दाखवत बिबट्याला पळवून लावले आणि मुलाला त्याच्या तावडीतून सोडवले.
4. हा मुद्दा विधानसभेत कोणी उपस्थित केला?
आमदार हिरामण खोसकर यांनी हा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला.
5. वनविभागावर कोणती टीका करण्यात आली?
बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याची टीका करण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.