Nashik Income Tax Raid Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Income Tax Raid: शोभेच्या फर्निचरमध्ये सापडल्या तब्बल 26 कोटींच्या नोटा!

Sampat Devgire

Income tax News: नाशिकात (Nahsik) प्राप्तिकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. सलग दोन दिवस सुरू असलेल्या या कारवाईत एका सराफा व्यावसायिकाच्या 20 हून अधिक मालमत्तांवर छापेमारी करण्यात आली आहे. प्राप्तिकर विभागाने (Income Tax Department) नाशिक शहरातील एका मोठ्या सराफा व्यावसायिकाच्या दुकानात छापेमारी केली. या छापेमारीत शोभेसाठी बनविलेल्या एका लाकडी डेस्कमध्ये चक्क 26 कोटी रुपयांची रोकड लपवल्याचं आढळून आलं. यातील काही कोटींची रक्कम 500 रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात एका कापडी झोळीमध्ये आढळली. आश्चर्याची बाब म्हणजे कोणालाही संशय येणार नाही आणि सापडणार नाही, याची काळजी सराफा व्यावसायिकाने घेतली होती.

प्राप्तिकर विभागाच्या पथकाने (Income Tax Department) सुरुवातीला सराफा व्यावसायिकाच्या दुकानात छापा मारला यावेळी, विक्रीसाठी असलेल्या सोन्याच्या दागिन्यांव्यतिरिक्त फारसे काही आढळलं नाही. मात्र, सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी पुन्हा एकदा दुकानात बारकाईने तपासणी केली. यावेळी कोणालाही संशय येणार नाही, अशा शोभेच्या लाकडी वस्तूमध्ये कोट्यवधींच्या पाचशे रुपयांच्या नोटा आढळल्या. या नोटा पाहून कारवाईसाठी गेलेल्या अधिकारीही थक्क झाले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्राप्तिकर विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या पथकात जवळपास 54 अधिकारी होते. नागपूर जळगाव आणि नाशिक (Nagpur Jalgaon and Nashik) येथील हे संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे. विशेष महानिरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली होती. नाशिकमध्ये सराफाच्या दालनात कारवाई करताना संस्थेच्या बांधकाम व्यवसायाच्या नावाने पहिल्या मजल्यावरील कार्यालयात तपासणी झाली. त्यानंतर शहरातील घरं, कार्यालय अशा सात ठिकाणी एकाच वेळी तपासणी करण्यात आली. ही तपासणी सुरू असतानाच संबंधितांचे नातेवाईक आणि हितसंबंध असलेल्या मनमाड तसेच नांदगाव येथील ठिकाणांवरही तपासणी झाली. तर अत्यंत गजबजलेल्या आणि मध्यवर्ती ठिकाणांवर झालेल्या कारवाईची चांगलीचं चर्चा सुरु आहे.

प्राप्तिकर विभागाने केलेली ही कारवाई तब्बल 23 तास सुरू होती. या कारवाईत 26 कोटी रुपयांची रोकड आढळली. ही रोकड मोजण्यासाठी सात नोट काउंटिंग मशीन आणाव्या लागल्या. 14 तास हे काम सुरू होते. या संदर्भात प्राप्तिकर विभाग दोन महिन्यांपासून संबंधित संस्थेवर पाळत ठेवून होता. त्यातून मिळालेल्या विश्वसनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT