Nashik NMC announced approved corporators Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik: कोर्टाच्या आदेशानंतर भाजपकडून स्विकृत नगरसेवकांची घोषणा, पक्षांतर्गत नाराजी टाळण्यासाठी आणला नवा फॉर्म्युला

Nashik civic politics: नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची घोषणा झाली. भाजपने सहा जणांना संधी देताना एक वर्षाचा फॉर्म्युला आखल्याची चर्चा आहे. ठाकरे आणि शिंदे गटालाही प्रत्येकी दोन जागा मिळाल्या.

Sampat Devgire

NMC Politics News: नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीवरून भाजपमध्ये मोठी रस्सीखेच पाहायला मिळाली. अखेर न्यायालयाच्या दबावानंतर सत्ताधारी भाजपने आज सहा स्वीकृत नगरसेवकांची घोषणा केली. मात्र, सर्वच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांत तीव्र स्पर्धा होती. त्यामुळे नाराजी टाळता आली नाही. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने पक्षांतर्गत नाराजी टाळण्यासाठी भाजपने नियुक्तीचा एक वर्षाचा फॉर्म्युला पुढे आणल्याची चर्चा आहे.

स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपमध्ये ३०० हून अधिक इच्छुक होते. त्यामुळे सहा जागांवर कोणाला संधी द्यायची, हा स्थानिक नेत्यांसमोर मोठा प्रश्न होता. पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे समर्थक आणि स्थानिक पदाधिकारी यांच्यातून उमेदवारांची निवड करताना अनेक इच्छुकांना डावल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. ही नाराजी दूर करणे पक्षापुढे आव्हान असणार आहे.

भारतीय जनता पक्षाने आज स्वीकृत नगरसेवक पदासाठी सहा जणांना संधी दिली. भाजपने स्वीकृत नगरसेवकांना संधी देण्याआधी त्यांचा चांगलाच ब्रेन वॉश केला. भाजपने वरिष्ठांशी चर्चा करून पाच वर्षांऐवजी एक वर्षाचा स्वीकृत नगरसेवक कालावधी निश्चित केला आहे. इच्छुकांना त्याबाबत आधीच कल्पना देऊन त्याची जाणीव करून देण्यात आली आहे. संधी देण्याअगोदरच भाजपच्या इच्छुकांचे राजीनामे घेण्यात आले आहेत. त्यानंतर महापौरांकडून महासभेत इच्छुकांची घोषणा झाली.

भाजपने स्वीकृत नगरसेवक म्हणून प्रवक्ते अजित चव्हाण, नामको बँकेचे संचालक हेमंत धात्रक, आमदार देवयानी फरांदे यांचे निकटवर्तीय संदीप लेनकर, उद्योग आघाडीच्या रोहिणी नायडू, नवीन नाशिकचे पदाधिकारी रामहरी सभेराव आणि चंद्रशेखर पंचाक्षरी यांना संधी दिली आहे.

शिवसेना एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही पक्षांकडे देखील इच्छुकांची मोठी गर्दी होती. इच्छुकांच्या गर्दीमुळे शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्यालयासमोर निवडणुकीत उमेदवारी दिलेल्यांना संधी देऊ नये. निष्ठावंतांचा विचार करावा असा फलक देखील झळकला होता. मात्र त्याचा फारसा फरक झाला नाही. शिवसेनेचे वरिष्ठ नेते दत्ता गायकवाड यांचे चिरंजीव हेमंत गायकवाड आणि सामनाचे पत्रकार बाबा गायकवाड यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देण्यात आली.

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने माजी नगरसेवक चंद्रकांत लवटे आणि शिक्षण मंडळाचे माजी सदस्य बाबुराव आढाव यांना स्वीकृत नगरसेवक पदासाठी संधी दिली. महापौर हिमगौरी आडके यांनी आज झालेल्या महासभेत स्वीकृत नगरसेवकांची घोषणा केली. यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र कोणतीही संधी मिळाली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT