

Beed Municipal Politics: बीड नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत काल झालेल्या गोंधळाचे पडसाद जिल्ह्याच्या राजकारणात उमटू लागले आहेत. लोकशाही पायदळी तुडवत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मनमानी कारभाराविरोधात भाजपाचे नेते आक्रमक झाले आहेत. सर्वसाधारण सभेत विषय क्रमांक चार सुरू होण्यापूर्वीच सभागृहात प्रचंड गोंधळ उडाला आणि तीव्र निषेध करत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नगरसेवक सभागृह सोडून बाहेर पडले होते. जर विरोधक सभागृहात नव्हतेच, तर नंतर कागदोपत्री तब्बल १७ ठराव मंजूर झाले कसे? असा संतप्त सवाल आता विरोधकांकडून केला जात आहे.
यातील तब्बल १५ ठराव पूर्णपणे बेकायदेशीर व सत्ताधाऱ्यांनी एकतर्फी रेटल्याचा गंभीर आरोप भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवक, पदाधिकारी, नेत्यांनी केला आहे. या मनमानी व बोगस कारभाराविरोधात आक्रमक होत या दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि सभेतील सर्व विषय रद्द करून नव्याने विशेष सभा बोलवावी, अशी मागणी केली आहे.
सभेमध्ये शहराच्या विकासाचा खरा बोजवारा कसा उडाला आहे, याचा पर्दाफाश करताना नगरसेवकांनी २ कोटी ७० लाख रुपयांच्या मुरुम खरेदी व टाकण्याच्या कामाचा हिशोब मागितला. शहरातील रस्त्यांवर प्रत्यक्षात केवळ चार टोपले मुरुम टाकून २.७ कोटी रुपयांचे घसघशीत बोगस बिल लाटण्यात आल्याचा खळबळजनक आरोप यावेळी करण्यात आला. हा कोटींचा काळा बाजार आणि पैसा नेमका कोणाच्या घशात घातला? असा थेट सवाल महिला नगरसेविकांनी सत्ताधाऱ्यांना केला. या जाबामुळे सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
शहराच्या विकासाचा आणि भ्रष्टाचाराचा लेखाजोखा विचारणाऱ्या महिला नगरसेविकांना उत्तरे देण्याचे धाडस सत्ताधाऱ्यांमध्ये उरले नाही. उलट, भ्रष्टाचारावरून लक्ष विचलित करण्यासाठी सत्ताधारी नगरसेवकांनी महिला लोकप्रतिनिधींवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक टीकाटिप्पणी करण्यास सुरुवात केली. सभागृहात हक्काचे प्रश्न विचारणाऱ्या महिलांचा हा अनादर आणि अपमान सहन करण्यापलीकडचा असून, बीडच्या पालिकेत महिलांचा जाणीवपूर्वक असा अवमान केला जात असल्याने भाजप नगरसेवकाकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
भ्रष्टाचाराचे बिंग फुटत असल्यामुळेच सत्ताधारी आता अशा निकृष्ट राजकारणावर उतरल्याची चर्चा शहरभर रंगली आहे. सभा सुरू असतानाच जेव्हा गोंधळ वाढला आणि सत्ताधाऱ्यांच्या मनमानीचा निषेध करत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक सभात्याग करून बाहेर पडले, तेव्हा सभागृहात केवळ मोजके सत्ताधारी उरले होते. असे असतानाही कोणताही चर्चा, सूचक-अनुमोदक किंवा मतदान न घेताच घाईगडबडीत १७ पैकी तब्बल १५ ठराव बेकायदेशीरपणे एकतर्फी मंजूर दाखवण्यात आले. हा सरळसरळ जनतेच्या विश्वासाशी आणि लोकशाही नियमांशी खेळ असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या संपूर्ण बोगस ठरावांची अंमलबजावणी रोखण्यासाठी सर्व नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. या बेकायदेशीर १५ ठरावांची फेरतपासणी करून ते तातडीने रद्द करावेत आणि सर्वसामान्य नागरिकांच्या व शहराच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी विशेष सभा तात्काळ बोलवावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.
सर्वसाधारण सभेमध्ये अवैधरीत्या ठराव पास करण्याचा सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न करण्यात आला. बहुमत नसताना काहीतरी मुद्दे रेटून नेणं हा प्रकार घडला, भाजपचे आणि शरद पवार गटाचे नगरसेवक यांनी अनेक ठरावांवर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे ही सभा ग्राह्य धरू नये, ती रद्द करावी. तसेच पुढच्या सभेची तारीख द्यावी, अशी मागणी आम्ही मुख्याधिकारी,जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन केली असल्याचे भाजपाचे नेते योगेश क्षीरसागर यांनी सांगीतले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.