Nashik Politics : नाशिकमध्ये भाजपच्या हिमगौरी आहेर आडके या महापौर झाल्या आहेत. भाजपने स्पष्ट बहुमत असतानाही शिवसेनेला सत्तेत सहभागी करुन घेतले असून शिवसेनेचे विलास शिंदे यांना उपमहापौर करण्यात आले आहे. महापौर, उपमहापौर निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर आता सर्वात महत्त्वाच्या असलेल्या सभागृहनेते पदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे.
महापालिकेतील सभागृहनेते पदासाठी भाजपमधील चार दिग्गज नगरसेवकांची नावे सर्वांधिक चर्चेत आहेत. त्यामध्ये माजी सभागृहनेते सुधाकर बडगुजर, माजी उपमहापौर गुरमित बग्गा, दिनकर पाटील व स्थायी समितीचे माजी सभापती शाहु खैरे यांच्या नावाची चर्चा आहे.
परंतु सभागृहनेते पदासाठी स्पर्धेत असलेले वरील चारही नगरसेवक नुकतेच भाजपवासी झाले आहेत. सुधाकर बडगुजर हे शिवसेना ठाकरे गटातून भाजपमध्ये आले आहेत. त्यांची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. दिनकर पाटील हे विधानसभा निवडणुकीवेळी बंडखोरी करुन मनसेत दाखल झाले होते. विधानसभेला त्यांनी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार सीमा हिरे यांच्याविरोधात निवडणूक लढवली. त्यात दिनकर पाटील पराभूत झाले. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी पुन्हा मनसेला रामराम करत भाजपमध्ये घरवापसी केली व नगरसेवक पदाची निवडणूक लढवली व निवडून आले. मागील टर्ममध्ये भाजपची सत्ता असताना दिनकर पाटील यांच्याकडे सभागृहनेते हे पद होते.
तर शाहू खैरै हे कॉंग्रेसमध्ये होते. शाहु खैरे काँग्रेसमध्ये असताना दोनदा स्थायी समितीचे सभापती राहीले आहेत. त्यांनी यंदाच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला. प्रभाग १३ मधून ते भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत.
मनसेच्या सत्ताकाळात उपमहापौर राहिलेले गुरुमित बग्गा हेही भाजपमध्ये नवीन आहेत. मागील टर्ममध्ये अपक्ष निवडून आले. परंतु निवडणुकीच्या तोंडावर ऐनवेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रभाग पाच मधून ते भाजपच्या तिकीटावर निवडून आले. त्यामुळे सभागृहनेते पदासाठी या चार नावांपैकी एकाचा विचार करताना निष्ठावंताची नाराजी उफाळून येण्याची शक्यता लक्षात घेता पक्षाकडून सावध पावले उचलली जात असल्याचे समजत आहे.
महापालिकेच्या सभागृहात सर्वाधिक म्हणजे १२२ पैकी ७२ नगरसेवक भाजपचे निवडून आले आहेत. त्यामुळे महापौरपद भाजपचा झाला आहे. उपमहापौरपद भाजपने शिवसेनेला दिले असले तरी इतर सभागृहनेते, स्थायी समितीसह विषय समित्यांवर मात्र स्पष्ट बहुमत असल्याने भाजपचेच वर्चस्व राहणार आहे. स्पष्ट बहुमत असतानाही उपमहापौरपद शिवसेनेकडे गेल्याने कुठेतरी भाजप नगरसेवकांमध्ये आता इतर पदांवर आपले वर्चस्व राहावे अशी सुप्त भावना आहे. त्यातीलच एक महत्वाचे पद म्हणजे सभागृहनेतेपद आहे.
सभागृहनेते पद हे सभागृहात अत्यंत महत्त्वाचे पद आहे. सत्ताधारी व विरोधकांमधील दुवा तसेच धोरणात्मक विषयावर बाजू मांडण्याचे महत्त्वाचे काम या पदावरील व्यक्तीला करावे लागते. सभागृहाचे कामकाज सुरळीत चालविण्याची जबाबदारी सभागृह नेत्याला पार पाडावी लागते. त्यामुळे महत्वाच्या व प्रतिष्ठेच्या असलेल्या सभागृहनेतेपदासाठी भाजपमध्ये अनेक दिग्गज इच्छुक असून त्यांच्याकडून लॉबिंग सुरू झाली असून रस्सीखेच दिसून येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.