Nashik NMC, Eknath Shinde,Devendra Fadnavis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik NMC Politics : राजकारणात शब्दाला किंमत... तो पाळण्यासाठी भाजप -शिवसेनेची धडपड, स्वीकृतसाठी नवा फॉर्म्युला ठरवला?

BJP and Shiv Sena Nashik : भाजप व शिवसेना हे दोन्ही पक्ष निवडणुकीनंतर सत्तेत सोबत बसले आहेत. मात्र निवडणुकीवेळी दोन्ही पक्षांनी उमेदवारी देऊ न शकलेल्या अनेकांना स्वीकृत नगरसेवकपदाचे आश्वासन दिले होते.

Ganesh Sonawane

Nashik Politics : नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपने स्वबळावर निवडणुक लढवली होती. कारण भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी होती. मात्र तरीही उमेदवारी न मिळाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. भाजपमध्ये एबी फॉर्म वाटपावेळी देखील मोठा गोंधळ उडाला होता.

तर शिवसेना व राष्ट्रवादीने एकत्रित निवडणूक लढवली होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या वाट्याला काही जागा द्याव्या लागल्या. त्यामुळे शिवसेनेतील काही इच्छुकांनाही निवडणूक लढवता आली नाही. त्यामुळे भाजप व शिवसेना दोन्ही पक्षात उमेदवारी न दिलेल्यांपैकी अनेकांना पक्षाने स्वीकृत नगरसेवकपदाचे आश्वासन दिले होते.

अनेक नाराज इच्छुकांनी अन्य पक्षात जाऊन उमेदवारी केली होती. मात्र, पक्षाने काहींना स्वीकृत नगरसेवकपदाचे आश्वासन देत बंडखोरी रोखली होती. बंडखोरी किंवा विरोधात काम करू नये यासाठी स्विकृत नगरसेवकपदाचा शब्द पक्षाने दिला होता. आता तो शब्द पाळण्यासाठी भाजपसह शिवसेनेला आटापिटा करावा लागत आहे. कारण जागा कमी आणि इच्छुकांची संख्या भरमसाठ झाली आहे.

महापालिका निवडणुकीत भाजप 72 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला. शिवसेना (शिंदे) पक्षाला 26 तर शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाला15 जागा मिळाल्या. तौलानिक संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 6, शिवसेना शिंदे गटाला 2, शिवसेना ठाकरे गटाला 1 व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांना उतरत्या क्रमांकाने 1 जागा अशा एकूण 10 जागा स्विकृतसाठी वाट्याला येणार आहे.

भाजपच्या वाट्याला केवळ ६ जागा आल्या आहेत. मात्र इच्छुकांची संख्या पाचशेहुन अधिक आहे. भाजपमध्ये स्वीकृत नगरसेवक पदासाठी पाचशे जणांनी दावेदारी केली आहे. पक्ष कार्यालयातील रजिस्टर नावांनी भरलं आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी व अनेकांना दिलेला शब्द पाळण्यासाठी भाजप व शिवसेनेने एक वर्षासाठी स्वीकृत नगरसेवकपद देण्याचा निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. याबाबत अद्याप दोन्ही पक्षांकडून अधिकृत तशी काही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. मात्र असा निर्णय घेतल्यास व एक-एक वर्षाचा फॉर्म्युला ठेवल्यास भाजपच्या 30 तर शिवसेनेच्या 10 जणांना स्वीकृत नगरसेवक होण्याची संधी मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT