Keshav Porje, Pravin Tidme  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Politics : नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला चौथा बळी; उद्योजकाच्या मृत्यूनंतर ठाकरे-शिंदे दोन्ही शिवसेना आमने-सामने, नेमकं काय घडलं?

Nashik Pothole Death Shiv Sena Dispute : नाशिक शहरातील खड्ड्यांनी आणखी एकाचा बळी घेतला आहे. याच मुद्द्यावरुन गुरुवारी दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांमध्ये महापालिकेत जोरदार खडाजंगी झाली.

Ganesh Sonawane

Nashik Politics : नाशिक शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे होणारे अपघात वाढले आहेत. रस्त्यांची दुरवस्था आणखी एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळण्यास कारणीभूत ठरली आहे. रस्त्यावरील खड्डा चुकविताना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात कामटवाडे येथील उद्योजक नीलेश प्रल्हाद कोतकर (वय ४०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

एक्स्लो पॉइंट चौकातील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात नीलेश यांच्या दुचाकीचा ताबा सुटला आणि ते रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. कोतकर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी तसेच आई-वडील असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे.

नाशिकमधील ही काही पहिलीच घटना नाही. नाशिकच्या खड्ड्यांनी घेतलाला हा चौथा बळी आहे. २४ मार्च रोजी प्रभाकर निकम, ६ जून रोजी प्रवीण गायकवाड, २५ जुलै रोजी दीपाली बेळे आणि २८ जुलै रोजी उद्योजक निलेश कोतकर अशा चार जणांचा मृत्यू झाला आहे.

त्यामुळेच नाशिकमधील खड्ड्यांचा मुद्दा ऐरणीवर आला असून नाशिक महापालिकेतील राजकीय वातावरण देखील तापलं आहे. याविषयावरुन गुरुवारी (दि. ३०) नाशिकमध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील दोन्ही शिवसेना महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी दोन्ही गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलाच शाब्दिक वाद झाला.

ठाकरे गटाच्या आक्रमक नगरसेवकांनी महापौरांच्या दालनात धडक दिली. यावेळी मोठा हाय होल्टेज ड्रामा बघायला मिळाला. ठाकरे गटाचे नगरसेवक महापौरांच्या दालनात ठिय्या मांडून बसले. तर दुसरीकडे मृत नातेवाईकांच्या कुटुंबीयांकडून शहर अभियंताच्या दालना बाहेर ठिय्या आंदोलन केलं.

शिंदे यांच्या शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे हे खड्ड्यामुळे मृत कोतकर यांच्या कुटुंबियांना सोबत घेऊन आयुक्त मनीषा खत्री यांची भेट घेण्यासाठी आले होते. मात्र आयुक्त दालनात उपस्थित नसल्याने तिदमे यांनी फोनवरच कोतकर कुटुंबाचा आयुक्तांशी संवाद साधून दिला. त्यानंतर तिदमे आयुक्त दालनाबाहेर या विषयावर पत्रकार परिषद घेत होते.

दरम्यान त्याचवेळी शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते केशव पोरजे यांनी आपल्या समर्थक नगरसेवकांसह तिथे धडक दिली. यावेळी पोरजे यांनी, तिदमे यांना उद्देशून म्हटले की, तुम्ही स्वतः सत्तेत आहात, तरीही तुम्हाला खड्ड्यांच्या प्रश्नावर आंदोलन करावे लागत आहे. त्यापेक्षा सत्ता सोडा, आपण दोघेही एकत्र रस्त्यावर उतरून प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढा देऊ असे म्हटले. त्यावरून तिदमे व पोरजे या दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली.

पोरजे यांनी नगरविकास खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याचा मुद्दा उपस्थितीत केला. सत्तेत राहून आंदोलन करतात अशी टीका केली.

त्यावर तिदमे यांनी हा भावनिक मुद्दा असून राजकारण करु नका असा मुद्दा मांडला. तिदमे म्हणाले, विरोधक म्हणून तुमची भूमिका काय ते सांगा, सभागृहात सुद्दा तुम्ही थांबत नाही... त्यावर पोरजे म्हणाले, सभागृहात बोलू दिलं जात नाही, तुम्हाला तरी बोलू दिलं जातं का? काही बोललो तर लगेच सहा महिन्यांसाठी निलंबन करतील. तुम्ही विशेष महासभेची मागणी करताय तरी ती मान्य होत नाही.

त्यावर तिदमे यांनी आम्ही सभागृहात आम्ही एक-एक तास बोलतो असं प्रत्युत्तर दिलं. दोघेही एकमेकाला प्रत्युत्तर देत होते. त्यामुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते.

दरम्यान, दोन्ही नेत्यांमधील वाद वाढत असल्याचे पाहून बाळा दराडे यांनी मध्यस्थी केली. त्यांनी दोन्ही बाजूंच्या पदाधिकाऱ्यांना शांत करत वाद मिटवला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT