

Nashik MHADA Scam : राज्यभर गाजत असलेल्या नाशिकमधील म्हाडा फसवणूक प्रकरणात आणखी दोन अधिकाऱ्यांना अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. भूमी अभिलेख कार्यालयाचे बनावट नकाशे व फेरफार दस्तऐवजांच्या आधारे म्हाडासह शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक तहसील कार्यालयातील आजी-माजी दोन मंडल अधिकाऱ्यांना सरकारवाडा पोलिसांनी अटक केली आहे.
नाशिक तहसील कार्यालयात कार्यरत मंडल अधिकारी दिलीप कचरू वामन आणि सेवानिवृत्त मंडल अधिकारी श्याम एकनाथ बोरसे यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने दोघांना ३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे महसूल व भूमी अभिलेख विभागात खळबळ उडाली आहे.
नाशिकच्या बहुचर्चित म्हाडा फसवणूक प्रकरणात यापूर्वी बांधकाम व्यावसायिक दिनेश कन्हैयालाल ऊर्फ सोनू मनवानी, दीपक भगवारदान करमचंदाणी, नायब तहसीलदार नितीन पाटील, भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक बिपिन काजळे, महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहायक संचालक कल्पेश पाटील, भूमापन परीक्षक श्रीकांत परदेशी आदींना अटक करण्यात आलेली असून चौकशी करण्यात आलेली आहे. अटक केलेले सर्व संशयित सध्या जामिनावर आहेत.
शहर गुन्हेशाखेकडून याप्रकरणाचा तपास सुरु असून तपासात संशयित वामन व बोरसे यांनी भूमी अभिलेख कार्यालयाचे बनावट मोजणी नकाशे, हिस्सा फॉर्म क्रमांक ४ व १२, गटबुक व जुन्या कागदपत्रांची कोणतीही कायदेशीर पडताळणी न करता त्यावर कारवाई केल्याचे निष्पन्न झाले आहे.
तहसील कार्यालयाचे अधिकृत आदेश नसतानाही विकासक, जमीनमालक व गुंतवणूकदारांशी संगनमत करून १४ सर्वे व गटांतील फेरफार नोंदी बेकायदेशीररीत्या मंजूर व प्रमाणित केल्याचा आरोप काही प्रकरणांत आहे. त्यामुळे म्हाडा आणि शासनाचे आर्थिक व कायदेशीर नुकसान झाल्याचे तपासात समोर आले आहे.
राज्य शासनाच्या २०१३ च्या सर्वसमावेशक गृहनिर्माण धोरणानुसार ४,००० चौरस मीटरपेक्षा मोठ्या मूखंडांवर २० टक्के जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न गटासाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, बनावट मोजणी नकाशे, खोटे आकारफोड पत्रके आणि कृत्रिम भूखंड विभाजन करून हा नियम टाळण्यात आल्याचा आरोप आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.