Nashik Politics : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून महाविकास आघाडीमध्ये आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एन्ट्री झाली आहे. मनसे नेते दिनकर पाटील यांनी ही मोठी घोषणा केली असून, या निर्णयामुळे नाशिकमधील राजकीय समीकरणे पुर्णंता बदलली आहे.
सोमवारी (दि.१०) महाविकास आघाडीचे नेते आणि मनसेच्या नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत एकत्र निवडणुका लढण्याची घोषणा केली. मविआ आणि मनसेच्या स्थानिक नेत्यांनी एकत्र येत नाशिकमध्ये यापुढील सर्व निवडणूका एकत्रित लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यातील वरिष्ठ नेते राज ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेतृत्व याबाबत अंतिम निर्णय घेतील, असेही पाटील यांनी सूचित केले आहे.
विशेष म्हणजे मनसेसोबतच्या युतीमुळे बिहारच्या राजकारणात फटका बसू शकतो, अशी काँग्रेसला भीती वाटत आहे. त्यामुळे मनसे सोबत युती करण्याबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर 'वेट अँड वॉच'ची भूमिका आहे. परंतु असे असताना नाशिकमध्ये महाविकास आघाडी आणि मनसेच्या प्रमुख नेत्यांनी एकत्रित येत पत्रकार परिषद घेतली व युतीचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे ही पत्रकार परिषद राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे.
यावेळी बोलताना मनसे नेते दिनकर पाटील म्हणाले, 'आता इथून पुढे ज्या ज्या निवडणुका असतील... तेव्हा हे गटबंधन झालंच आहे. लोकशाही जिवंत राहण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. देशात राहुल गांधी यांनी मत चोरीवर सरकार आल्याचं निदर्शनास आणून दिलं. मुंबईत एकत्रित मोर्चा काढला. तब्बल 96 लाख दुबार मतदार आहेत. सत्तेत असलेल्या शिवसेना शिंदे गटाने देखील मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचं सांगितलं आहे. जनतेला न्याय मिळाला पाहिजे. ओला दुष्काळ, कर्जमाफी यासाठी आम्ही लढतो आहोत.
संयुक्त पत्रकार परिषदेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डॉ. डी. एल. कराड म्हणाले, राज्यातील सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. भ्रष्टाचार, जातीवाद आणि जनतेच्या प्रश्नांवर सरकारकडून होत असलेले दुर्लक्ष रोखण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आगामी सर्व निवडणुका सर्वांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात भ्रष्टाचाराचे थैमान आहे. जाती जातीत भांडण लावण हेच काम सरकारकडून होत आहे. महाराष्ट्रात येत्या निवडणुकांमध्ये महायुतीचा प्रभाव कमी करण्यासाठी आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याचे कराड म्हणाले.
दरम्यान, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले असल्याची समजते. त्यामुळे नाशिकमध्ये महाविकास आघाडी आणि मनसेची औपचारिक स्वरुपात युती झाली असून, याचा परिणाम राज्यभरातील निवडणुकीच्या समीकरणांवर होण्याची शक्यता असून बिहार निवडणुका आटोपताच राज्यपातळीवरही युतीचा निर्णय होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.