Pune Nashik Semi High Speed Rail: भाजपचे अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाशिक-पुणे रेल्वे प्रश्नावर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीत नाशिक-पुणे रेल्वे मार्गावर, दोघांमध्ये चर्चा झाली. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे संकेत मंत्री विखे पाटलांनी दिले.
या भेटीवर अन् तिथं रेल्वे मार्गाच्या कोणत्या नकाशावर, काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी टोकदार प्रश्न उपस्थित केला. थोरात यांचा बोचणारा प्रश्न असल्याने मंत्री विखे पाटलांकडून त्यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे आता लक्ष लागलं आहे.
बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले, "पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे नाशिक-पुणे रेल्वे प्रश्नावर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना भेटल्याचे कळाले. आम्हाला आनंदच आहे; मात्र त्यांनी तीनपैकी नेमक्या कोणत्या रेल्वे मार्गाचा नकाशा रेल्वेमंत्र्यांना दाखवला, हे जनतेसमोर स्पष्ट करणे आवश्यक आहे."
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला 2020 नंतर गती देण्यात आली. फेब्रुवारी 2020 मध्ये सेंट्रल रेल्वेकडून डीपीआर मंजूर झाला होता. त्यानुसार (Nashik) नाशिक-सिन्नर-संगमनेर-साकूर-आळेफाटा-नारायणगाव-मंचर-राजगुरुनगर-चाकण-आळंदी-हडपसर-पुणे असा मार्ग निश्चित करण्यात आला होता.
यासंदर्भात अनेक बैठका झाल्यानंतर मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आणि भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू झाली होती. ही संपूर्ण प्रक्रिया माझ्या साक्षीने झालेली आहे. भूसंपादनामध्ये ज्या अडचणी आल्या, त्यातून व्यवस्थित मार्गही काढलेले होते. मग अचानक सरकार बदलल्यानंतर जीएमआरटी का आठवली? मार्गात बदल करण्याचे खरे कारण नेमके काय? असा सवाल थोरात यांनी केला.
पालकमंत्री रेल्वेमंत्र्यांना भेटल्याचे सांगितले जात आहे. पण त्यांनी नेमकी कोणती भूमिका मांडली आणि कोणता मार्ग सुचवला? आता आपल्यासमोर तीन मार्ग आहेत. दोन मार्ग संगमनेर आणि अकोले तालुका येथील आहेत, तर तिसरा मार्ग शिर्डीवरून आहे.
पालकमंत्र्यांनी नेमक्या कोणत्या मार्गाचा नकाशा रेल्वेमंत्र्यांसमोर ठेवला आणि चर्चा केली, ते नेमक्या कोणत्या मार्गाचा पाठपुरावा करत आहेत? त्याचा नकाशा संगमनेर तालुक्यातील जनतेला द्यावा, जेणेकरून जनतेच्या मनातील संभ्रम दूर होतील. संगमनेरची रेल्वेसंदर्भात आज निर्णय झाला नाही, तर पुढील पन्नास वर्षे हा प्रकल्प होणार नाही; त्यामुळे मार्गाबाबत कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही, असे थोरातांनी ठणकावून सांगितले.
मुंबई -नाशिक-पुणे हा गोल्डन ट्रँगल आहे. सर्वात जास्त उद्योग, रोजगार असलेला हा भाग आहे. नाशिक आणि पुणे थेट रेल्वेने जोडणे ही इथल्या व्यापाराची आणि शेतीची गरज आहे. सरळ मार्ग तयार करण्याऐवजी वाकडी वाट इथल्या विकासाला परवडणारी नाही. रेल्वे आता झाली तरच होईल; नाहीतर पुढे 100 वर्षे ती होईल की नाही, याची खात्री नाही. रेल्वेच्या विषयावरून राजकारण करण्याची ही वेळ नाही, असेही थोरात म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.