Nashik Shalarth ID Scam : राज्यातील बहुचर्चित शालार्थ आयडी व शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे.
या प्रकरणातील गेल्या अडीच महिन्यांपासून फरार असलेले मालेगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक जाहिद हुसैन मोहम्मद अली यांना अटक केली आहे. रौनकाबाद येथील राहत्या घरातून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे मालेगावच्या सामाजिक व शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, संशयित मुख्याध्यापक जाहिद हुसैन मोहम्मद अली यांना बुधवारी (दि.१८) न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बडी मालेगाव हायस्कूलमधील शिक्षक भरती प्रक्रियेत सुमारे पावणेदोन कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची तक्रार संस्थेतील शिक्षिका ड्रौनब मोहम्मद आणि सीमा निहाल दुल्हा यांनी गेल्या वर्षी पवारवाडी पोलिस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. कोट्यावधी रुपयांच्या कथित आर्थिक घोटाळ्याचे स्वरुप लक्षात घेता हा तपास पगारवाडी पोलिसांकडून नाशिक आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.
या प्रकरणी संस्थेचे चेअरमन इर्शाद शेख, मुख्याध्यापक जाहिद हुसैन, लिपिक नासिर हुसैन, अबू हुरैरा यांच्यासह १३ शिक्षक आणि एजंट नवीद सगीर यांना संशयित आरोपी करण्यात आले आहे. जवळपास १३ महिने तुरुंगात शिक्षा भोगल्यानंतर यातील पाच पुरुष शिक्षकांची जामिनावर सुटका झाली आहे.
मात्र याप्रकरणात चेअरमन व मुख्याध्यापकांसह १३ जणांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला होता. तेव्हापासून म्हणजेच गेल्या ७५ दिवसांपासून मुख्याध्यापक जाहिद हुसैन फरार होते. अखेर आर्थिक गुन्हे शाखेने सापळा रचून त्यांना अटक केली.
दरम्यान, या प्रकरणात आठ महिला शिक्षकांसह अन्य बारा आरोपी फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. फरार संशयितांचा शोध सुरू असून लवकरच त्यांना अटक केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. भरतीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा अपहार नेमका कसा करण्यात आला आणि यात आणखी कोणाचा सहभाग आहे, यांचा सखोल तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. मुख्याध्यापकांच्या अटकेनंतर या प्रकरणातील तपास अधिक वेगाने होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.