Triple Talaq Allegedly Pronounced Inside Nashik District Court : देशात 'तिहेरी तलाक' ही अनिष्ट प्रथा कायद्याने हद्दपार करण्यात आली असतानाही नाशिकमध्ये या कायद्यालाच आव्हान देणारा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, नाशिक जिल्हा न्यायालय परिसरातच पतीने पत्नीला तीन वेळा ‘तलाक’ म्हणत वैवाहिक संबंध तोडल्याची घटना घडली आहे.
जुन्या गुन्ह्याच्या रागातून पतीने पत्नीला न्यायालयाच्या आवारातच मारहाण करीत तीन वेळा 'तलाक' असे उच्चारत वैवाहिक संबंध तोडले. याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात पती सासू आणि सासरे अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिहेरी तलाकच्या प्रथेवर कायदेशीर बंदी असूनही, संबंधित प्रकरणे समोर येणे सुरूच आहे. नाशिक शहरातील तिहेरी तलाकचा हा सहावा गुन्हा ठरला आहे.
पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे तिचा पती, सासू आणि सासरे अशा तिघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्वजण अहिल्यानगर येथील मुकुंदनगर परिसरात राहतात. यापूर्वीही पीडितेने सासरच्या मंडळींविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. याच जुन्या प्रकरणासंदर्भात दुपारी दीड ते पावणेतीनच्या सुमारास पीडिता आणि तिचे सासरचे नातेवाईक नाशिक जिल्हा न्यायालयात उपस्थित होते.
दरम्यान, आधी दाखल झालेल्या गुन्ह्याचा राग मनात ठेवून संशयित सासऱ्याने न्यायालयाच्या आवारातच पीडितेशी वाद घालत आरडाओरडा केला. त्यानंतर तिच्या अंगावर धावून जात बुरखा ओढल्याचा प्रकार घडला. या कृत्याद्वारे विनयभंग केल्याचा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे.
संशयित सासूने पीडितेला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. याच वादादरम्यान पतीने तिला मारहाण केली. तसेच, "मी तुझ्यापेक्षा सुंदर मुलीशी लग्न केले आहे. आता तुला तलाक देतो," असे म्हणत त्याने न्यायालयाच्या आवारातच तीन वेळा ‘तलाक, तलाक, तलाक’असा उच्चार करुन तोंडी तलाक दिला.
या घटनेमुळे न्यायालय परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. तिहेरी तलाकला कायद्याने बंदी असतानाही भरदिवसा न्यायालयाच्या आवारातच असा प्रकार घडल्याने न्यायालयाच्या आवारात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेनंतर पीडित विवाहितेने सरकारवाडा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज पत्की यांच्या सूचनेनुसार संशयितांविरोधात भारतीय न्याय संहितेतील कलम ७४, ११५ (२), ३५१ (२), ३५१ (३), ३५२ आणि ३ (५) तसेच मुस्लिम महिला (विवाह हक्क संरक्षण) कायदा २०१९ मधील कलम ४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला उपनिरीक्षक सुप्रिया अंभोरे करीत आहेत.
दरम्यान, मुस्लिम महिला (विवाह हक्क संरक्षण) कायदा २०१९ नुसार तोंडी, लेखी किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून एकाच वेळी तीन वेळा 'तलाक' देणे हा दंडनीय आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. या कायद्याच्या कलम ४ नुसार गुन्हा सिद्ध झाल्यास पतीला तीन वर्षांपर्यंतच्या कारावासाची आणि दंडाची कठोर शिक्षा होऊ शकते.
नाशिकमध्ये आतापर्यंत सहा प्रकरणे
उपलब्ध माहितीनुसार, नाशिक शहरात 'तिहेरी तलाक'चे पहिले प्रकरण १ सप्टेंबर २०२३ रोजी इंदिरा नगर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आले होते. त्यानंतर, २३ एप्रिल, २२ ऑगस्ट आणि २९ नोव्हेंबर २०२५ रोजी, तसेच ८ मे २०२६ रोजी मुंबई नाका पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा नोंदवण्यात आला होता. १४ नोव्हेंबर २०२६ रोजी नोंदवलेल्या ताज्या प्रकरणामुळे, शहरातील अशा प्रकरणांची एकूण संख्या सहावर पोहोचली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.