

Jalgaon ACB Trap : जळगाव शहरात वीज चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी तक्रारदाराकडे 40 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी महावितरणच्या तिघा संशयित अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई केली. पांडे चौक परिसरात सापळा रचून ही कारवाई केली असून, एमआयडीसी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणात तडजोडीअंती 15 हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी आणि प्रत्यक्ष व्यवहार सुरू असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली. सहायक अभियंता विशाल वसंत नेमाडे, वरिष्ठ तंत्रज्ञ भरत कडू तायडे आणि वरिष्ठ तंत्रज्ञ रवींद्र छन्नु पाटील अशी संशयितांची नावे आहेत. तिघांनाही अटक करण्यात आली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, तीनही संशयित महावितरणच्या महसूल व देयक उपविभागात कार्यरत आहेत. तक्रारदार जळगाव शहरातील रहिवासी असून शनिवारी (दि. 14) रोजी सकाळी संशयितांनी तक्रारदार यांच्या घरी जाऊन नवीन वीज मीटरची तपासणी केली. यावेळी घरातील विद्युत उपकरणांचे फोटोही काढण्यात आले.
त्यानंतर वरिष्ठ तंत्रज्ञ भरत तायडे यांनी तक्रारदार यांना फोन करून पांडे चौक येथे बोलावले. पांडे चौक येथे संशयितांनी तक्रारदार यांच्या घरातील विजेचा लोड जास्त असल्याचे तसेच सर्विस वायर बायपास करून विज चोरी होत असल्याचे सांगितले. या प्रकरणी वीज चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी व पुढील कारवाई टाळण्यासाठी तक्रारदाराकडे 40 हजार रुपयांची लाच मागितली.
तक्रारदाराने याबाबत त्याच दिवशी जळगाव ACB कडे तक्रार केली. या तक्रारीनंतर पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान तडजोडीअंती 15 हजार रुपयांची लाच स्वीकारण्याचे ठरले. वरिष्ठ तंत्रज्ञ भरत तायडे यांनी ही रक्कम स्वीकारण्यास संमती दर्शवल्याचे समोर आले.
ठरल्याप्रमाणे वरिष्ठ तंत्रज्ञ भरत तायडे यांनी लाचेची रक्कम सहायक अभियंता विशाल नेमाडे यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानंतर सहायक अभियंता विशाल नेमाडे यांनी तक्रारदारांकडून 15 हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.