Nashik Zilla Parishad : जिल्हा परिषद नाशिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या दौऱ्यात प्रशासकीय कामकाजातील त्रुटी आणि कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कठोर भूमिका घेतली आहे. महादेवनगर, टाकेहर्ष व देवडोंगरी या तीन ग्रामपंचायतींच्या अधिकाऱ्यांना एकाचवेळी निलंबित करण्यात आलं आहे.
जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने यासंदर्भात स्वतंत्र निलंबन आदेश जारी केले. निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये महादेवनगरचे मुरलीधर पांडुरंग गावित, टाकेहर्षचे तुषार रुपसिंग राजपूत व देवडोंगरीचे सतीश नानाभाऊ बच्छाव यांचा समावेश आहे. आमकोर पवारांनी तिघांनाही एकाच वेळी निलंबनाचा दणका दिला आहे.
आर्थिक अनियमितता आणि कर्तव्यातील कसूरचे आरोप
महादेवनगरचे ग्रामपंचायत अधिकारी मुरलीधर गावित यांच्यावर ग्रामपंचायतीतील आर्थिक अनियमिततेसह मुख्यालयात अनधिकृतरीत्या अनुपस्थित राहणे, मासिक सभेला गैरहजर राहणे, लेखापरीक्षणासाठी शासकीय दप्तर उपलब्ध न करून देणे आणि कारणे दाखवा नोटिशीला मुदतीत खुलासा सादर न करणे, असे आरोप ठेवण्यात आले आहेत. (Nashik News)
टाकेहर्षचे ग्रामपंचायत अधिकारी तुषार राजपूत यांच्यावर २६ जानेवारी २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजवंदन न केल्याचा तसेच कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. देवडोंगरीचे ग्रामपंचायत अधिकारी सतीश बच्छाव यांच्याविरुद्ध १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतील आर्थिक अनियमितता, कारणे दाखवा नोटिशीला वेळेत खुलासा न देणे आणि कर्तव्यात कसूर करणे, या बाबींवरून कारवाई करण्यात आली आहे.
अहवालाच्या आधारे निलंबनाचे आदेश
पंचायत समिती त्र्यंबकेश्वरचे गटविकास अधिकारी यांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांकडून महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम, १९६७ मधील नियम ३ चा भंग झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम, १९६४ मधील नियम ३(१)(अ) अन्वये निलंबनाचे आदेश देण्यात आले.
निलंबनाच्या कालावधीत संबंधित अधिकाऱ्यांचे मुख्यालय पंचायत समिती, त्र्यंबकेश्वर (मालेगाव) येथे निश्चित करण्यात आले आहे. मुख्यालयी हजर राहणे, नियमानुसार निर्वाह भत्त्यासाठी आवश्यक प्रमाणपत्र सादर करणे आणि ग्रामपंचायतींचा कार्यभार संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडे हस्तांतरित करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
पंचायत समिती त्र्यंबकेश्वरलाही भेट; कामकाजाचा घेतला आढावा
मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान पंचायत समिती त्र्यंबकेश्वर येथेही भेट देऊन प्रशासकीय कामकाजाची पाहणी केली. यावेळी गटविकास अधिकारी रविकांत सानप उपस्थित होते. पंचायत समिती स्तरावरून ग्रामपंचायतींच्या कामकाजावर ठेवण्यात येणारे नियंत्रण, विविध विकासकामांची अंमलबजावणी आणि प्रशासकीय यंत्रणेची कार्यक्षमता या अनुषंगाने त्यांनी आढावा घेतला.
दुष्काळ निवारणाशी संबंधित कामे आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातील प्रगती यांसारख्या महत्त्वाच्या बाबींमध्ये प्रशासकीय दिरंगाई होऊ नये, तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या गांभीर्याने पार पाडाव्यात,अशा सूचना यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी दिल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.