

Proposed Liquor Sale Restrictions in Panchavati for Nashik Kumbh Mela : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामतीर्थ, पंचवटी आणि त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तलाव परिसरातील मद्यविक्रीवर निर्बंध घालण्याच्या हालचाली सुरू आहेत. या भागातील मद्यविक्रीची दुकाने किती किलोमीटरच्या परिघात बंद ठेवावीत आणि निर्बंधांचा कालावधी किती असावा, याबाबत जिल्हा प्रशासनाने नाशिक महापालिका आणि त्र्यंबक नगरपालिकेकडे तातडीने अभिप्राय मागितला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसंदर्भात उच्चस्तरीय आढावा बैठक झाली होती. या बैठकीत कुंभमेळ्याचे धार्मिक पावित्र्य जपणे, भाविकांची सुरक्षा, स्वच्छता आणि कायदा-सुव्यवस्था याबाबत चर्चा करण्यात आली होती. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देश-विदेशातून लाखो भाविक, वारकरी आणि साधू-महंत नाशिकमध्ये दाखल होण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर रामतीर्थ आणि पंचवटी परिसरातील दोन ते तीन किलोमीटरच्या परिघातील मद्यविक्रीवर निर्बंध आणण्याचे निर्देश देण्यात आले होते.
महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ मधील कलम १३९ च्या आधारे मद्यविक्रीवरील निर्बंधांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महापालिकेकडून यावर तातडीने शिफारसी व मते मागवली आहेत. महापालिका प्रशासनाच्या अभिप्रायानंतर शासन स्तरावरून याबाबत अंतिम अधिसूचना जारी केली जाणार असून, मद्यविक्री व्यावसायिकांचे या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
मद्यविक्रीवरील निर्बंध निश्चित करण्यासाठी प्रामुख्याने दोन बाबींवर स्पष्ट माहिती मागवली आहे. रामतीर्थ, पंचवटी व कुशावर्त तलाव परिसरातील नेमक्या किती किलोमीटरच्या परिसरातील मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवावीत, याचे अचूक अंतर, तसेच, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने हे निर्बंध नेमक्या किती कालावधीसाठी लागू राहावेत, या दोन मुद्द्यांवर स्पष्ट अहवाल शासनाने मागवला आहे. या अहवालांनंतरच मद्यविक्री दुकानांवरील निर्बंध घातले जाणार आहेत.
रामतीर्थ, पंचवटी आणि कुशावर्त तलाव परिसरातील मद्यविक्रीची दुकाने किती अंतरापर्यंत बंद ठेवावीत आणि हे निर्बंध किती कालावधीसाठी लागू करावेत, या दोन मुद्द्यांवर प्रशासनाचा अभिप्राय महत्त्वाचा ठरणार आहे. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिफारसी प्राप्त झाल्यानंतर शासनाकडून अंतिम निर्णय घेतला जाणार असून, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्रीबाबत नेमके कोणते निर्बंध लागू होतात, हे अधिसूचना जारी झाल्यानंतर स्पष्ट होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.