

Girish Mahajan Meets Maharashtra Governor Jishnu Dev Varma : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पवित्र पर्वाचा शुभारंभ ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहण सोहळ्याने होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण होणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरु असून मान्यवरांना या सोहळ्याचे निमंत्रण दिले जात आहे.
कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवार (दि. २३) महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची भेट घेत त्यांना सोहळ्याचे निमंत्रण दिले. यावेळी मंत्री महाजनांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या तयारीची तसेच या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व असलेल्या सोहळ्याच्या नियोजनाची माहिती राज्यपालांना दिली.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ही धार्मिक व सांस्कृतिक परंपरेची महत्त्वपूर्ण केंद्रे असून, सिंहस्थ कुंभमेळा हा महाराष्ट्राच्या आध्यात्मिक वैभवाचे दर्शन घडविणारा महत्त्वाचा उत्सव आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून देशभरातील संत-महंत, साधू आणि भाविकांच्या श्रद्धेला एकत्रित व्यासपीठ मिळणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन भव्य, दिव्य, सुरक्षित आणि सुव्यवस्थित पद्धतीने करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून, आवश्यक पायाभूत सुविधा, भाविकांची सोय आणि विविध प्रशासकीय व्यवस्थांच्या नियोजनावर भर देण्यात येत असल्याची माहिती मंत्री महाजन यांनी यावेळी दिली. या भेटीप्रसंगी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे आणि लोकभवन कार्यालयाचे प्रबंधक निशिकांत देशपांडे उपस्थित होते.
राष्ट्रपतींना निमंत्रण
२१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अन्य मंत्री आणि अधिकारी - पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेत राष्ट्रपतींना निमंत्रण दिलं.
राष्ट्रपतींना सादर करण्यात आलेले निमंत्रण वैशिष्ट्यपूर्ण कलात्मक संकल्पनेवर आधारित होते. निमंत्रण पेटी उघडताच कुंभमेळ्याची पौराणिक पार्श्वभूमी, आध्यात्मिक महात्म्य आणि भव्यता दर्शविणारी त्रिमितीय (पॉप-अप) कलाकृती उलगडते. दृष्टी, श्रवण, गंध, चव आणि स्पर्श या पंचेंद्रियांशी संबंधित अनुभवांचा समावेश असलेल्या या संकल्पनेतून नाशिकचा सांस्कृतिक वारसा, पवित्र गोदावरीचा महिमा आणि भारतीय परंपरेतील कुंभमेळ्याचे अनन्यसाधारण महत्त्व प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आले. आदिवासी विकास विभागांतर्गत शबरी नॅचरल्सच्या उत्पादनांचा या भेटवस्तू संचात समावेश होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.