Nashik Teacher Transfer : पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नियुक्ती मिळालेल्या शिक्षकांना सोयीच्या ठिकाणी शाळा बदलून देण्याच्या नावाखाली आर्थिक मागणी केल्याच्या प्रकरणात नाशिक जिल्हा परिषद प्रशासनाने कारवाई केली आहे. नांदगावचे शिक्षण विस्तार अधिकारी योगेश थोरात यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी घेतला आहे.
या प्रकरणाशी संबंधित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर सीईओ ओमकार पवार यांनी कारवाईचे पाऊल उचलले.
जिल्हा परिषदेत ९९९ जागांसाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात आली. पहिल्या टप्प्यात समुपदेशनाच्या माध्यमातून ६८० शिक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्या. मात्र, नियुक्तीनंतर काही शिक्षकांनी मिळालेली शाळा बदलून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
मिळालेली शाळा गैरसोयीची वाटत असल्याने संबंधित शिक्षकांनी नियुक्ती बदलण्यासाठी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र, एकाही शिक्षकाला शाळा बदलून दिली जाणार नाही, अशी भूमिका मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी घेतली होती.
शाळा बदलून घेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांची ही अडचण लक्षात घेऊन शिक्षण विस्तार अधिकारी योगेश थोरात यांनी कथितरीत्या आर्थिक मागणी केल्याचा आरोप आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपले संबंध असल्याचे सांगून सोयीच्या ठिकाणी नियुक्ती मिळवून देण्यासाठी त्यांनी पैशांची मागणी केल्याचे या प्रकरणातून समोर आले.
या संदर्भातील ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी प्रकरणाची दखल घेतली. त्यानंतर थोरात यांचे निलंबन करण्यात आले, तर प्राथमिक शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले.
या प्रकरणात सुमारे ४२ शिक्षकांच्या शाळा बदलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कारवाई केवळ एका अधिकाऱ्याच्या निलंबनापुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण बदली प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
या पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या शाळा बदलण्याच्या सर्व प्रकरणांची चौकशी केली जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित नियुक्त्या कोणत्या प्रक्रियेनुसार बदलण्यात आल्या, याची तपासणी महत्त्वाची ठरणार आहे.
प्राथमिक शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांना सक्तीच्या रजेवर पाठविल्यानंतर त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी सरोज जगताप यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
दरम्यान, सरोज जगताप यांच्याकडे यापूर्वी माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचाही अतिरिक्त कार्यभार होता. आता हा कार्यभार माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी आर. आर. बोडके यांच्याकडे देण्यात आला आहे.
प्रशांत दिग्रसकर रुजू होईपर्यंत किंवा पुढील आदेश मिळेपर्यंत बोडके माध्यमिक शिक्षण विभागाचा कार्यभार सांभाळणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.