Nashik ZP, Omkar Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik ZP : शासनाचा एक आदेश अन् ग्रामसेवकांमध्ये खळबळ ; आता बायोमेट्रिक हजेरीसह GPS लोकेशनही सक्तीचे

Nashik ZP, Omkar Pawar : ग्रामसेवकांना बायोमेट्रिक आणि GPS हजेरी सक्तीचे केले आहे. त्यामुळे यापुढे आता ग्रामसेवकांच्या मनमानी उपस्थितीला आळा बसणार आहे.

Ganesh Sonawane

Nashik ZP News : राज्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये ग्रामसेवकांच्या अनुपस्थितीमुळे नागरिकांची कामे प्रलंबित राहण्याच्या तक्रारी कायम येत असतात. ग्रामसेवक कार्यालयात उपलब्ध नसल्याने नागरिकांना दाखले, प्रमाणपत्रे तसेच इतर प्रशासकीय कामांसाठी ग्रामपंचायत कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागतात. ग्रामसेवकांच्या या मनमानीला आता चाप बसणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून राज्यातील सर्व ग्रामसेवकांना (ग्रामपंचायत अधिकारी) बायोमेट्रिक आणि GPS प्रणालीद्वारे हजेरी नोंदवणे अनिवार्य केले आहे. यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना लेखी आदेश देण्यात आले आहेत.

नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनाही शासनाच्या ग्रामविकास विभागाचे आदेश मिळाले असून परिपत्रक जारी करत या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये ग्रामसेवक वेळेवर उपस्थित राहत नाहीत. ग्रामपंचायतींत ग्रामसेवक येत नाही, भेटत नाही अशा नागरिकांच्या व लोकप्रतिनिधींच्या सातत्याने तक्रारी येत होत्या. ग्रामसेवक नसल्याने अनेक कामांना अडथळा येत होता. त्यावर शासनाने त्यांची बायोमेट्रीक हजेरी सुरू केली होती. मात्र, या हजेरीला विरोध झाला.

त्यामुळे अनेक ठिकाणी या निर्णयाची योग्य अंमलबजावणी होत नव्हती, तशा तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची प्रशासनाने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. शासनाने पुन्हा एकदा ग्रामसेवकांची बायोमेट्रीक हजेरी सक्तीची करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील सर्व ग्रामसेवकांमध्ये खळबळ उडाली आहे.

शासनाने स्पष्ट केले आहे की, यापूर्वी पाठवलेल्या संदर्भांकित पत्रांचे तात्काळ अवलोकन करून संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामसेवकांची हजेरी या डिजिटल प्रणालीद्वारेच घेतली जाईल, याची दक्षता घ्यावी. या आदेशाकडे दुर्लक्ष किंवा अंमलबजावणीत टाळाटाळ करणाऱ्यांवर आगामी काळात प्रशासकीय कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रशासनाने आपल्या स्तरावर आवश्यक ती सर्व तांत्रिक व प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून ग्रामसेवकांची हजेरी डिजिटल पद्धतीने सुनिश्चित करण्याचे शासनाचे निर्देश आहेत.

बायोमेट्रिक हजेरीसोबतच GPS लोकेशन प्रणालीचा वापर केल्यामुळे ग्रामसेवक प्रत्यक्षात ग्रामपंचायत कार्यालयात किंवा त्यांच्या कार्यक्षेत्रात उपस्थित आहेत किंवा नाही, याची अचूक नोंद ठेवणे शक्य होणार आहे. यामुळे ग्रामसेवकांच्या मनमानी उपस्थितीला आळा बसून ग्रामस्थांचे हेलपाटे व कामांना होणारा विलंब याला आळा बसेल अशी अपेक्षा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT