

Nashik Zilla Parishad : गतवर्षात नाशिक जिल्हापरिषदेचा एकुण ७९ कोटींचा अखर्चित निधी शासनाकडे परत गेला. मिळालेला निधी पूर्णपणे खर्च करण्यात जिल्हापरिषद प्रशासन अपयशी ठरलं. प्रशासनावर तब्बल ७९ कोटींचा निधी परत करण्याची नामुष्की ओढावल्याने जिल्ह्याचे आर्थिक नुकसान झाले असून, पर्यायाने विकासकामांना त्याचा फटका बसला आहे.
यापूर्वी, संतापलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी यावरुन जिल्हापरिषद प्रशासनाला चांगलच धारेवर धरलं होतं. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी परत गेलेल्या निधीची कारणे सादर करण्याचे आदेश जिल्हापरिषदेला दिले होते.
त्यामुळे, शासनाकडे परत गेलेला निधी पुन्हा मिळवण्यासाठी आता प्रशासनाची धावपळ सुरु झाली आहे. जिल्ह्यातील मंत्री व प्रशासनाने निधी परत मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु केले आहे. त्यासाठी प्रशासनाने शासनाच्या वित्त विभागाला पत्र पाठवले आहे. याशिवाय जिल्ह्यातील मंत्री, आमदारांनी देखील शासनाला निधीसाठी साकडे घातले आहे.
जिल्हा परिषदेला मिळणाऱ्या निधीचे व्यवस्थापन ‘VPDA’ प्रणालीद्वारे केले जाते. निधी मिळाल्यानंतर एक वर्षाच्या कालावधीत खर्च न झालेली रक्कम शासनाकडे परत जमा होते. त्यानुसार एक वर्षाच्या आत निधी खर्च करणे बंधनकारक आहे. एक वर्षाच्या आत निधी खर्च न करणे हे प्रशासनाचे अपयश आहे.
मार्चअखेर होणारी धावपळ व निधी अखर्चित राहण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाने ‘VPDA’ प्रणाली लागू केली. मात्र, वर्षभरात खर्च न केल्याने ७९ कोटींचा निधी शासनाकडे परत गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आमदार, मंत्र्यांनी या संदर्भात शासनाकडे विनंती करून हा निधी जिल्हा परिषदेला देण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान यासंदर्भात राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी लक्ष घातलं आहे. या संदर्भात झिरवाळ यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्याकडून माहिती घेतली. निधी मागणीचे पत्र राज्याच्या सचिवांना देण्यात येणार असून, त्यांच्यासमोर हा विषय मांडण्याची तयारी मंत्री झिरवाळांनी दर्शविली आहे. गरज पडल्यास यासंदर्भात राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचीही आपण मदत घेऊ, अशी माहिती त्यांनी दिली. त्यामुळे प्रशासन व राजकीय पातळीवरून आता निधी मिळविण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.