Dada Bhuse News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्ग अपघाताला ठरले 'हे' धक्कादायक कारण ?

संपत देवगिरे

Accident on Samriddhi Highway : समृद्धी महामार्गावर वैजापूर येथे झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला, तर २० जखमी झाले. समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातातील सर्व मृत नाशिकचे आहेत. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आर्थिक मदत जाहीर केली आहे. दरम्यान, या अपघाताला 'आरटीओ'ची नेहमीची कार्यशैली कारणीभूत असल्याची चर्चा सुरू आहे.

मध्यरात्री वैजापूरजवळ टेम्पोच्या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातातील मृतांच्या नातेवाइकांना त्यांनी प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली असून, जखमींवर शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत, असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. मध्यरात्री जांबरगाव टोल नाक्याजवळ टेम्पो ने ट्रकला धडक दिल्यामुळे त्यात १२ जणांचा मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले. हे सर्व प्रवासी नाशिक परिसरातील होते.

अपघात झाल्याचे समजताच लगेच बचाव कार्य सुरू करण्यात आले, याविषयीही मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली असून, अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करून तपास करण्याचे आणि दोषींवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनीदेखील चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अपघाताचे कारण पुढे आल्यास 'आरटीओ' वर हे प्रकरण शेकणार काय, याचीदेखील चर्चा आहे.

समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिकाच सुरू आहे. त्यामुळे तो पूर्णतः राजकीय टीकेचा विषयदेखील ठरला आहे. आजच्या अपघाताविषयीदेखील असेच एक सरकारी विभागाच्या कार्यशैलीचे गंभीर कारण असल्याची चर्चा सुरू आहे. त्यात 'आरटीओ'कडून ट्रकची तपासणी सुरू होती. त्यासाठी हा ट्रक अचानक थांबल्याने मागून येणारी बस त्यावर आदळल्याची चर्चा आहे. त्यातील वास्तव तपासणीनंतरच पुढे येईल.

'आरटीओ' विभागाची तपासणी कशासाठी होते, त्यांची कार्यशैली याबाबत काहीही लपून राहिलेले नाही. समृद्धी महामार्गावर वाहनांची गती शंभर किलोमीटर प्रतितास असल्याने येथे तपासणी न करता जिथे वाहने समृद्धी महामार्गाच्या एक्झिटमधून बाहेर पडतात, तिथे तपासणी झाली असती, तर हा अपघात टळला असता, असा काहींचा दावा केला जात आहे.

दरम्यान, अपघाताचे वृत्त पुढे आल्यावर अनेक राजकीय नेते त्यावर प्रतिक्रिया तसेच मदतीसाठीदेखील पुढे आले. याबाबत शिवसेना (Shivsena) नेते, खसदार संजय राऊत, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे. अपघातातील बहुतांश मृत नागरिक नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या मतदारसंघातील आहेत. त्यांनी याबाबत घाटी रुग्णालयाशी संपर्क करून मदतीच्या सूचना दिल्या आहेत.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT