Nashik Congress News : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्याशी संपर्क ठेऊ नका, अशी ताकीद काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांना दिली होती. मात्र,पटोले यांची पाठ फिरताच, वाढदिवसाच्या निमित्त करत आज खोसकर यांनी त्यांचा आदेश अव्हेरला. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खोसकर रविवारी थेट भुजबळ फार्म हाऊसवर पोहोचले.
गेल्या आठवड्यात काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाशिकच्या नेत्यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती. छगन भुजबळ यांच्यावर टीका करा, अशी सूचना केली होती.
आमदार खोसकर हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. जिल्हा परिषदेचे राजकारण करीत करीत ते विधानसभेसाठी २०१९ मध्ये काँग्रेस पक्षात गेले. मात्र ठेकेदार लॉबीत विशेष ऊठबस असलेल्या खोसकर यांची सत्ताधारी पक्षाशी सतत लगट असते.
उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या दौऱ्यात हिरामण खोसकर हे देखील आमचेच आहेत. तांत्रीकदृष्ट्या ते काँग्रेस पक्षात आहेत, असे विधान केले होते. त्याचे तीव्र पडसाद उमटले. अनेक नेत्यांनी खोसकर यांच्यावर टिका केली होती. त्यामुळे खोसकर काँग्रेस पक्षाचेच आहेत, असा खुलासा त्यांना करावा लागला होता.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांच्याकडेही त्याबाबत तक्रारी होत्या. त्यामुळे त्यांनी आमदार खोसकर यांना ताकीद देत, छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांच्यावर टीका करा. त्यांच्या व्यासपीठावर जाऊ नका, अशी जाहीरपणे सूचना दिली होती. मात्र पटोले यांची पाठ फिरताच खोसकर यांनी ती अव्हेरली. रविवारी त्यांनी भुजबळ फार्मवर जाऊन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना शुभेच्छा दिल्या. त्यामुळे तो चर्चेचा विषय आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.