Rajabhau Waje-Hemant Godse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rajabhau Waje News : नागरिक हेच माझे देव, 'देवदर्शन' नव्हे 'लोकदर्शन' करतो , वाजे यांचा टोला !

Nasik Loksabha 2024 : मतदान संपल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी लगेचच आपला जनता दरबार पुन्हा एकदा सुरू केला आहे. सुरू ठेवला आहे जनसंपर्क

Sampat Devgire

Waje Vs Godse News : लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यावर बहुतांशी उमेदवारांनी देवदर्शनाला जाणे पसंत केले आहे. निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर होणार असल्याने कोणी पंढरपूर, तुळजापूर, जेजुरी तर कोणी अष्टविनायक यात्रा करत आपल्या विजयासाठी देवांना साकडे घातले आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांनी विविध तीर्थस्थळांना भेटी देण्याचा सपाटा लावला आहे. सोमवारी त्यांनी तुळजापूर आणि जेजुरीला जाऊन पूजा केली. मात्र याच मतदारसंघातून खासदार गोडसे यांच्या विरोधात निवडणूक लढविणारे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे मात्र देवदर्शनाऐवजी लोकदर्शनात रमले आहेत.

लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी होत आहे.या निवडणुकीचा निकाल आता अवघ्या काही तासांवर आला आहे. अशा स्थितीत राजाभाऊ वाजे आजही नागरिकांमध्ये जाऊन संवाद साधत आहेत. मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वाजे यांनी लगेचच आपला जनता दरबार पुन्हा एकदा सुरू केला आहे. उद्या होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर 'सरकारनामा'च्या प्रतिनिधीने वाजे यांच्याशी संपर्क करत त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, मी देवदर्शनाला गेलो नाही. मतदारसंघातील लोक हेच माझे देव आहेत. त्यांच्यामध्ये जाऊन मी काम करतो आहे.त्यांचे आशीर्वाद घेतो आहे. निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता मलाही आहे, तो उद्या लागेल.

लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर वाजे यांच्याकडे कार्यकर्ते आणि नागरिकांची गर्दी पुन्हा एकदा सुरू झाली आहे. यामध्ये सिन्नरच्या परिचित आणि कार्यकर्त्यांचा भरणा होता. दोन दिवसांपूर्वी एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर मात्र ही स्थिती बदलली आहे. नाशिक (Nashik) शहरासह अन्य भागातील अनेक अनोळखी लोकही माझ्या भेटीला येत आहेत.त्यांची गर्दी आहे, असे वाजे यांनी सांगितले. वाजे यांची उमेदवारी सुरुवातीलाच जाहीर झाली. त्यामुळे त्यांनी 55 दिवस संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला याचा फायदा झाला.

या मतदारसंघातून वाजे यांच्या विरोधात निवडणूक लढविणारे महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांच्या समर्थकांनी निकाल आपल्या बाजुने लागेल, असा दावा करत विजयोत्सवाची मोठी तयारी केली आहे. मतदारसंघातील 135 ठिकाणी खासदार गोडसे यांच्या विजयानिमित्त अभिनंदनाचे फलक लावण्याची तयारी त्यांच्या समर्थकांनी केली आहे.या अभिनंदन फलकांची डिझाईन देखील तयार करण्यात आलेली आहे. तुमच्या 'सेलिब्रेशन'ची तयारी काय, अशी विचारणा वाजे यांना केली असता, ते म्हणाले काय निकाल लागेल. हे उद्या स्पष्ट होईल 'सेलिब्रेशन' चे काय निकाल लागला की पाच मिनिटात सेलिब्रेशन सुरू होईल.

(Edited by : Chaitanya Machale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT