Shani Shingnapur fake app Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shani Shingnapur fake app : शनैश्वर देवस्थान अ‍ॅप घोटाळाप्रकरण; जगभरातील भाविकांना गंडा, शिंदेचा शिलेदार म्हणतो, CBI तपास करा!

Shani Shingnapur Fake App Case: CBI Probe Demand Raised in Nagpur Session : अहिल्यानगर नेवासा इथल्या श्री शनैश्वर देवस्थानचा बनावट अ‍ॅपचा तपास सीबीआयमार्फत होण्यासाठी आमदार विठ्ठलराव लंघे याी नागपूर अधिवेशनात मागणी आहे.

Pradeep Pendhare

Shani Shanishwar temple fake application : अहिल्यानगरमधील श्री क्षेत्र शनैश्वर देवस्थानातील बनावट ऑनलाइन ॲपद्वारे झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आमदार विठ्ठल लंघे विधानसभेत पुन्हा एकदा आक्रमक झाले.

नागपूर हिवाळी अधिवेशनात त्यांनी हा संपूर्ण घोटाळा राज्य यंत्रणांच्या कुवतीबाहेरचा आहे. त्याचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा, अशी मागणी केली.

आमदार विठ्ठल लंघे म्हणाले, "श्री शनैश्वर देवस्थानात सुमारे सहा महिन्यांपूर्वी ऑनलाइन ॲप, क्यूआर कोड आणि पावती पुस्तकांच्या माध्यमातून देश-विदेशातील भाविकांची कोट्यवधी रुपयांची लूट झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी मागील पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्यात आले होते." मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही देवस्थानातील कारभार सभागृहात उघड करत, सायबर क्राईमच्या उच्चस्तरावर तपास केला जाईल, असे स्पष्ट आश्वासन दिले होते.

मात्र प्रत्यक्षात अहिल्यानगर सायबर क्राईम (Cyber Crime) विभागानेच संपूर्ण तपास केल्याचे समोर आले. अधिवेशनाच्या तोंडावर घाईघाईने देवस्थानातील केवळ दोन कर्मचाऱ्यांना अटक करून एक कोटी रुपयांपर्यंत चोरी झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. हा तपास अत्यंत असमाधानकारक व संशयास्पद असल्याचा गंभीर आरोप आमदार लंघे यांनी केला.

आमदार लंघे म्हणाले, "सात बनावट ॲप कार्यरत होते. प्रत्येक ॲपवर दोन लाखांहून अधिक सबस्क्रायबर होते. प्रत्येकी 1800 रुपयांची देणगी आकारली जात होती. केवळ एका ॲपमधून 36 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती असताना, एकूण घोटाळा 500 कोटींच्या घरात गेल्याची चर्चा भाविकांमध्ये आहे." अशा परिस्थितीत पोलिसांनी फक्त दोन आरोपी आणि एक कोटी रुपयांवरच तपास मर्यादित ठेवणे म्हणजे ‘डोंगर पोखरून उंदीर’ काढल्यासारखे हास्यास्पद चित्र असल्याची बोचरी टीका त्यांनी केली.

तपास 'सीबीआय'कडे देण्याची मागणी

'सर्व व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने झालेले असल्यामुळे संबंधित खात्यांचे तपशील सहज मिळू शकतात आणि पैसे ज्या खात्यांमध्ये गेले त्या सर्वांना ताब्यात घेणे शक्य आहे. मात्र वेळ जाईल तितके पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न होतील. त्यामुळे भाविकांच्या श्रद्धेची लूट करणाऱ्या या महास्कॅमचा निष्पक्ष, पारदर्शक आणि सखोल तपास 'सीबीआय'कडेच देण्यात यावा,' अशी ठाम मागणी आमदार विठ्ठल लंघे यांनी सरकारकडे केली.

लंघेच्या लक्षवेधीवर भोयर यांचे उत्तर

राज्यमंत्री डाॅ. पंकज भोयर यांनी आमदार लंके यांच्या लक्षवेधीवर म्हणाले, बनावट अॅप प्रकरणाचा तपास सायबर क्राईम विभागाचे अतिरीक्त पोलिस महासंचालकांकडून केला जात आहे. त्यांच्याकडून तातडीने अहवाल मागवला जाईल. त्याने जर आमदार लंघे यांचे समाधान झाले नाही, तर पुढील कार्यवाही होईल.

घोटाळ्यात दोघांना अटक

देवस्थानने 2018 पासून एका कंपनीला लाईव्ह दर्शनाचे हक्के दिले. 2022 ते 2025 दरम्यान इतर कंपन्यांच्या अॅपद्वारे लाईव्ह दर्शन व आॅनलाईन पूजा हक्क देण्यात आले. 2022 मध्ये विश्वस्त मंडळाने कार्यकारी अधिकारी व उपकार्यकारी अधिकारी यांना अधिकार दिले. उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे, कर्मचारी संजय शेटे, सचिन शेटे दोषी आढळले. संजय पवार व सचिन शेटे या दोघांना अटक करण्यात आली. दोघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. संजय पवार याने अॅपच्या माध्यमातून मिळालेले पैसे 37 लाख 15 हजार रुपये, तर सचिन शेटे याने 32 लाख पाच हजार रुपये देवस्थानकडे जमा न करता स्वतःच्या खात्यावर वर्ग केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT