Ram Shinde On Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ram Shinde On Ajit Pawar : 'अजित पवार ते वक्तव्य करून मला 'टॉर्चर' करतायेत'; राम शिंदेंनी पवार काका-पुतण्याला कात्रीत पकडलं!

Ram Shinde Reacts on Ajit Pawar & Rohit Pawar Family Issue in Baramati | BJP Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार रोहित पवार यांच्यात रंगलेल्या भावकीवर भाजप विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी प्रतिक्रिया देत खळबळ उडवून दिली.

Pradeep Pendhare

Ram Shinde on Pawar family dispute : राज्याच्या राजकारणात पवार कुटुंब नेहमीच केंद्रस्थानी राहतं. महायुती आणि महाविकास आघाडीच्या राजकारणात देखील पवार कुटुंब केंद्रस्थानी आहे. 2019 आणि 2024च्या निवडणुकीनंतर राज्यात अहिल्यानगरमधील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी आला. रोहित पवार यांनी विधानसभेत येथून एन्ट्री घेतली. भाजपच्या प्रा. राम शिंदे यांच्या ताब्यात असलेल्या या बालेकिल्ल्याला रोहित पवारांनी सुरूंग लावला.

तेव्हापासून शिंदे अन् पवार यांचं राजकीय द्वंद राज्यात चर्चेत असतं. 2024च्या विधानसभा निवडणुकीत बालेकिल्ला पुन्हा ताब्यात येईल, असं वाटत असताना, राम शिंदेंना पुन्हा पराभवाचा धक्का बसला. या पराभवामागे भाजप महायुतीबरोबर असलेले अजित पवार देखील तेवढेच जबाबदार असल्याचा ठपका राम शिंदेंनी वारंवार बोलून दाखवला असून, याबाबत त्यांनी भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील तक्रार केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि आमदार रोहित पवार यांच्यात सांगली इथल्या कार्यक्रमात भावकीवरून जुगलबंदी रंगली. गावकी संभाळताना, भावकीकडं लक्ष द्या, अशी टिप्पणी रोहित पवार यांनी केली. तोच धागा पकडून अजित पवार यांनी भावकीमुळं आमदार झालास, हे विसरू नको, असा टोला रोहित पवारांना लगावला. परंतु अजितदादांनी लगावलेला टोला रोहित पवार यांच्या इतकाच भाजपचे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या जिव्हारी लागला आहे.

भाजपचे (BJP) प्रा. राम शिंदे यांनी पवार काका-पुतण्यांच्या भावकीवरून अजितदादांना कात्रीत पकडत, कोंडी करणारी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "अजित पवार ते वक्तव्य करून सातत्याने मला 'टॉर्चर' करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे याबाबतीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा." अजित पवार हे वक्तव्य सातत्याने पुन्ह- पुन्हा करून शिळ्या कढीला ऊत का आणतायेत? असा सवाल राम शिंदेंनी केला आहे.

दरम्यान, नोव्हेंबर 2024 मध्ये अजित पवार आणि रोहित पवार कराडमधील प्रीतीसंगमावर समोरा-समोर आले होते. यावेळी देखील अजित पवार यांनी रोहित पवारांना, 'ढाण्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर, काय झालं असतं, असा अजित पवारांनी रोहित पवारांना मिश्कील टोला लगावला होता. यावर सभा झाली असती तर, निकाल वर-खाली झाला असता, अशी कबुली रोहित पवारांनी दिली.

अजित पवार यांच्या या टोलेबाजीवर देखील प्रा. राम शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली होती. म्हणाले होते, "राजकीय सारीपाटात मी बळी ठरलोय. अजित पवार बोलले त्यामुळे बोलतोय. मला वाटतं कौटुंबिक कलाह दरम्यान काही करार झाले, त्याचे प्रत्यय कर्जत-जामखेडमध्ये जाणवला. शरद पवार विधानसभेत पोहोचले तेव्हा माझा जन्म देखील झाला नव्हता. मोठी बलाढ्य शक्ती माझ्यासमोर होती. माझा सहावा क्रमांक लागतोय जो सर्वाधिक मतं घेऊन पराभूत झालो. महायुतीच्या लोकांबरोबर असं होत असेल तर, बरोबर नाही."

आता पुन्हा सांगलीत, अजित पवार आणि रोहित पवार यांच्या भावकीच्या जुगलबंदीवरून प्रा. राम शिंदे पवार काका-पुतण्यांना कात्रीत पकडलं आहे. या भावकीचे भाजप महायुतीत किती पडसाद उमटतात, हे आगामी काळात स्पष्ट होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांवर देखील त्याचा परिणाम होईल, असे दिसते. दरम्यान, प्रा. राम शिंदेंना भाजपकडून विधान परिषदेवर सभापतीपदावर संधी मिळाल्यापासून कर्जत-जामखेडमधील रोहित पवारांकडे असलेल्या अनेक राजकीय संस्था ताब्यात घेतल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT