Sharad Pawar Nashik Meeting : राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर अजित पवारांचा गट राज्य सरकारमध्ये सहभागी झाला. यावेळी अजित पवारांसह इतर आठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर झालेल्या समर्थकांच्या मेळाव्यात दोन्ही गटांनी एकमेकांवर येथेच्छ टीका केली. या मेळाव्यात शरद पवारांनी फुटीरांवर बोलण्यापेक्षा पुन्हा एकदा जनतेत जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. (Latest Political News)
राष्ट्रवादी काँग्रेसमधील दुहीनंतर शरद पवारांचा राज्यदौरा शनिवार (ता. ८)पासून सुरू झाला आहे. यावेळी पवार पहिली सभा राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते छगन भुजबळ यांच्या येवला या मतदारासंघात घेणार आहेत. ही सभा येवला येथे शनिवारी सायंकाळी होणार आहे. त्यासाठी पवार नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत. पवार पहिली सभा येवल्यात का घेत आहेत, याचे कारण छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.
भुजबळ इगतपुरी येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी भुजबळ यांनी अजित पवार यांनी घेतलेला निर्णय जनतेला मान्य असल्याचा दावा केला. भुजबळ म्हणाले, "ठाणे, कल्याण, भिवंडी अशा अनेक ठिकाणी अजित पवार यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांसह जनता उपस्थित होती. याचा अर्थ असा आहे की जनतेला अजितदादांनी घेतलेला निर्णय पसंत पडलेला आहे. त्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी जनता आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत. आता निर्णय झालेला आहे. संधी मिळाली त्यावेळी नाशिकमध्ये मोठे काम उभे केले आहे. आताही राज्यातील सर्व प्रश्नांवर सर्वशक्तीनिशी काम करणार आहोत."
दरम्यान, पक्षफुटीनंतर शरद पवार यांची येवला येथे पहिली सभा होत आहे. पवार येवला येथे सभा का घेत आहेत याचे कारणही भुजबळ यांनी मिश्किल टिपण्णी करत दिले आहे. छगन भुजबळ म्हणाले, "पहिले म्हणजे पवारांचे माझ्यावर अतोनात प्रेम आहे. दुसरे असे आहे की राष्ट्रवादी काँग्रेस स्थापना झाली, त्यावेळी पक्ष वाढवण्यासाठी राज्यभर फिरणारा पहिला नेता छगन भुजबळच होता. त्यानंतरच बाकीचे लोक पक्षात आले. मी त्यांच्यासोबत पहिल्यापासून असल्यानेच माझा पहिला नंबर लागतो."
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.