MLA Rohit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rohit Pawar News: आमदार रोहित पवार 26 जूनपासून मंत्रालयात करणार उपोषण; नेमकी कारण काय?

सरकारनामा ब्यूरो

राजेंद्र त्रिमुखे :

Ahmednagar News : नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड या दोन तालुक्यांच्या हद्दीवर नियोजित पाटेगाव-खंडाळा एमआयडीसी मंजुरीचा विषय पेटला असून या प्रश्नी या मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे मतदारसंघातील युवा, नागरिक यांच्यासह उपोषणाला बसणार आहेत.

कर्जत-जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीला वारंवार पाठपुरावा करूनही मंजुरी मिळत नसल्याने परिसरातील युवा, नागरिक यांनी आज (दि. 23 जून) थेट मंत्रालय गाठले असून तात्काळ निर्णय न झाल्यास येत्या 26 जूनपासून आमदार रोहित पवार यांच्यासह नागरिक मंत्रालयात उपोषण आंदोलन सुरू करणार असल्याचा अंतिम इशारा यावेळी देण्यात आला आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघात उद्योगाची चाके फिरावी आणि येथील युवांना रोजगार मिळावा या प्रमुख उद्देशाने मतदारसंघात औद्योगिक क्षेत्राची निर्मिती होण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी सातत्याने पाठपुरावा व प्रयत्न करत असल्याचे सांगितले आहे.

अशातच कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या एमआयडीसीला अंतिम मंजुरी देण्यासाठी सध्याचे सरकार वारंवार पाठपुरावा करूनही व आमदार रोहित पवार यांनी स्मरणपत्र देऊनही टाळाटाळ करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता कर्जत-जामखेड तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक आणि युवा वर्ग थेट मंत्रालयात गेल्याचं पाहायला मिळत आहे.

आज (दि.23 जून) मंत्रालयात कर्जत-जामखेडच्या युवा व नागरिकांनी उद्योग व खनिकर्म प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे, एमआयडीसीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सोनाली मुळे व मंत्रालय मुख्य सुरक्षा अधिकारी पोलीस उपायुक्त प्रशांत परदेशी यांची भेट घेऊन त्यांना एमआयडीसीबाबतच्या उपोषणाचे पत्र दिले आहे.

मौजे पाटेगाव व खंडाळा येथे औद्योगिक क्षेत्र स्थापन होण्याच्या दृष्टीने औद्योगिक विकास विभागाच्या मार्फत भू-निवड समितीची स्थळ पाहणी व ड्रोन सर्वेक्षण होऊन सर्वात उच्च असलेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीची मान्यता महाविकास आघाडी सरकारच्या काळात मिळाली होती.

एमआयडीसीला अंतिम मंजुरी मिळावी, याबाबत वेळोवेळी आमदार रोहित पवार यांनी विधिमंडळात हा मुद्दा उपस्थित केला. तसेच उद्योग मंत्र्यांची भेट घेऊन अधिसूचना जाहीर करण्याबाबत पाठपुरावाही केला आहे. मात्र, त्यावर निर्णय घेण्याबाबत आश्वासित केले असले तरी अजूनही त्यावर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही.

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री व उद्योगमंत्री यांच्या भेटीमध्ये आमदार रोहित पवार यांनी दोघांकडेही मौजे पाटेगाव व खंडाळा येथे औद्योगिक क्षेत्राची अधिसूचना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त 31 मे 2023 रोजी जाहीर करून इतर कायदेशीर बाबी या राजश्री शाहू महाराज जयंती दि. 26 जून 2023 पर्यंत पूर्ण कराव्यात, अशी विनंती केली.

राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीपर्यंत जर याबाबत ठोस निर्णय होऊन कर्जत-जामखेडमधील जनतेवर राजकीय द्वेशापोटी होणारा अन्याय दूर झाला नाही तर 26 जून 2023 पासून सर्व नागरिक, युवा वर्गासह हजारोंच्या संख्येने या अन्यायाच्या निषेधार्थ उपोषणाला बसणार आहोत, असं आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केलं होतं.

त्यानुसारच आता मतदारसंघातील नागरिक व युवांनी थेट मंत्रालय गाठून छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीपर्यंत एमआयडीसीला अंतिम मंजुरी मिळाली नाही तर आपण उपोषणावर ठाम असल्याचे यावेळी स्पष्ट केले. तशा आशयाचे पत्रही यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघात सलग दोन वेळेस भाजपकडून राम शिंदे हे निवडून आले होते. मात्र, 2019 ला रोहित पवार यांनी त्यांना बारामतीतून येत पराभवाचा धक्का दिला. त्यावेळी मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आणि नगरचे पालकमंत्रीपद असताना राम शिंदे यांचा झालेला पराभव शिंदे यांना मोठा जिव्हारी लागल्याचं बोललं जातंय.

त्यातूनच महाविकास आघाडीच्या सत्तेच्या काळामध्ये आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघात अनेक विकास कामे मंजूर करून आणल्याचे वेळोवेळी सांगितले. मात्र, गेल्या वर्षी अचानक सत्तांतर झाले आणि त्यानंतर मंजूर झालेल्या अनेक कामांना राज्य सरकारने स्थगिती दिली. याबाबत आमदार रोहित पवार यांनी वेळोवेळी नाराजी व्यक्त करत सरकारवर टीका केली आहे.

त्याचबरोबर मतदारसंघातील राजकीय विरोधक जाणीवपूर्वक जनतेची कामे होऊ देत नाहीत, असा आरोपही केला आहे. या पार्श्वभूमीवर रोजगाराच्या दृष्टीने कर्जत आणि जामखेड या दोन तालुक्यांच्या मध्यवर्ती असलेल्या या औद्योगिक वसाहतीचा प्रस्ताव विचाराधीन असतानाही त्याबाबतची मंजुरी विद्यमान सरकारकडून मिळत नसल्याने आता आमदार रोहित पवार यांनीही आक्रमक भूमिका घेतली असून उपोषणाचा निर्धार केला आहे.

नुकतंच त्यांनी पवार कुटुंबातील पहिली व्यक्ती उपोषण करणार असंही वक्तव्य केलं होतं. त्यामुळे येणाऱ्या 26 जून पर्यंत सरकार काय निर्णय घेतं? याकडे कर्जत आणि जामखेडकरांचे लक्ष लागले आहे.

आमदार रोहित पवार काय म्हणाले?

"महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्व प्रक्रिया पूर्ण करून ठेवली असताना सुद्धा सरकार बदलल्यामुळे आणि कदाचित राजकीय दबावामुळे उदय सामंत हे माझे मित्र असले तरी अंतिम मंजुरी मिळण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. कदाचित रोहित पवारांना श्रेय मिळू नये, यासाठी हे सर्व असावं. पण याच्यात अनेक युवांचं अतोनात नुकसान होतंय".

"हे काही राजकीय व्हिजन नसलेल्या नेत्यांना कळत नाही. हा सर्व प्रकार म्हणजे जेवण तयार करून ठेवलंय पण ताटच वाढलं नाही, असा विचित्र आहे. सरकारला आतातरी जाग येणं अपेक्षित आहे. मी आणि माझ्या मतदारसंघातील युवा आमच्या हक्कासाठी लढणार आणि जिंकणारच", असं रोहित पवार यावेळी म्हणाले.

(Edited By : Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT