Nilesh Lanke  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nilesh Lanke : ना मोबाईल विकत घेतला, ना घड्याळ- कपडेही कार्यकर्त्यांकडून! 'लाडोबा' खासदाराचा रुबाबच वेगळा!

Nilesh Lanke Shares Political Journey Sarkarnama Interview : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अहिल्यानगर दक्षिणचे खासदार नीलेश लंके यांची सकाळ माध्यम समूहाच्या सरकारनामा डिजिटल विशेष मुलाखत दिली.

Pradeep Pendhare

Ahilyanagar politics : खासदार नीलेश लंके यांचा राजकीय प्रवास शिवसेनेतून सुरू झाला. हिंदूहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक, अशी त्यांची आजही ओळख आहे. आता ते शरद पवार यांच्या राजकीय कुशीत आले. शिवसेनेचा कार्यकर्ता, शाखाप्रमुख, तालुकाप्रमुख, गावचा सरपंच, असा सुरू झालेल्या राजकीय प्रवासात नीलेश लंकेंनी आमदारकीनंतर दिल्लीत खासदार म्हणून धडक मारली आहे. सर्वसामान्य कुटुंबातील एखाद्याला आजच्या काळात राजकारणात करिअर करायचे म्हणजे, वाटतं तेवढं सोपं नाही. नीलेश लंके यांचा हा राजकीय प्रवास तसाच आहे.

नीलेश लंकेंच्या या प्रवासाला अधिक वेगवान कोणी केले असेल, तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी. तसं ते देखील कार्यकर्त्यांचा आवडता नेता, अतिशय साधी राहणीमान असलेल्या नीलेश लंके यांची दिनचर्या देखील झंझावाती आहे. मोटारसायकलपासून सुरू झालेला राजकीय प्रवास फाॅरच्युनरपर्यंत आला आहे. स्वतःला सर्वसामान्य म्हणून घेणारे, खर्च करण्याची ताकद नाही म्हणणारे, नीलेश लंके यांच्याकडे फाॅरच्युनर, महागडा मोबाईल, महागडं घड्याळ कसं काय? यावर डिवचताच, नीलेश लंके यांनी सर्व काही कार्यकर्त्यांनी दिल्याचं सांगून ट्रोल करणाऱ्यांचं अंग का दुखते? असा सवाल करत या सर्वांवर मनमोकळं केलं.

खासदार नीलेश लंके यांनी 2024च्या लोकसभेत अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात वेगळाच इतिहास रचला. भाजपचे दिग्गज मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांचे पुत्र सुजय विखे यांचा पराभव केला. ही लढत राज्यात लक्षवेधी झाली. खासदार लंकेंनी या सर्व राजकीय प्रवासावर भाष्य करताना, सकाळ माध्यम समूहाच्या सरकारनामा डिजिटलसमोर मनमोकळ्या गप्पा मारल्या. खासदार लंकेंच्या पारनेर तालुक्यातील हंगा गावातील त्यांच्या घरी झालेल्या गप्पांमध्ये त्यांच्या राजकीय प्रवासात कार्यकर्ता किती महत्त्वाचा यावर भाष्य केले.

खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी गावातील राजकारण करताना, दुचाकीवरून प्रवास केला. पुढं संघटनेच्या माध्यमातून सामाजिक काम करताना, कार्यकर्त्यांनी बोलेरो गाडी घेण्याची मदत केली, त्यातून प्रवास सुरू केला. अधिक प्रवास वाढल्यानंतर सफारी, पुढे फाॅरच्युनर गाडी घेतली. घेतली म्हणण्यापेक्षा नीलेश लंकेंनी काय कमावलं, तर लाख मोलाची माणसं कमावली. ही माणसं मला वळणावळणावर मदत करतात. माझ्या मोबाईलचा स्क्रिनगार्ड जरी खराब असेल, तर कार्यकर्ता मोबाईल घेऊन जाऊन ते बदलतो. माझा मोबाईल कार्यकर्त्याच्या हातात असल्यावर त्याला आवाज कमी आल्यास, तो नवीन मोबाईल आणून देतो. गाडी जरी खराब दिसली, तर कार्यकर्ता ती घेऊन जातो, आणि दुसरी देतो. त्यामुळे मला फिरायला, गाड्या-घोड्याला काही पैसे लागत नाही. ते संभाळायला कार्यकर्ते सशक्त असल्याचे सांगितले.

'मी ट्रोलला वगैरे महत्त्व देत नाही. काम करतो, त्याला लोकं बोलतात, नीलेश लंके घरात झोपून राहिल्यावर कोणाला माहिती होईल? फोटो खाली काय लिहिलं आहे, त्याकडे बघत बसल्यावर काय सामाजिक कामं होईल? असा सवाल करत आपलं कर्तव्य बजावत राहायचं', असं खासदार नीलेश लंके यांनी सांगितलं.

गाणी कोणी बनवली?

नीलेश लंके यांच्यावर बनवण्यात आलेल्या गीतांना 55 लाखापर्यंत व्ह्यूज असून, ही गाणी कोणी बनवली? कशी बनवली? यामागील यंत्रणा काय? याचा किस्सा स्वतः खासदार लंकेंनी सांगितले. ते म्हणाले, "आमची यंत्रणा अशीच आहे, कुणी काहीही करतं. शशी गव्हाणे, राहुल झावरे यांना वाटलंना, तिकडं एखादा धरतात, तेच गाणं बनवतात, सकाळी-सकाळी माझ्याकडे येऊन रिलिज करून घेतात. तेच करतात, तेच खर्च करतात, आपण कशाला डोकं चालवायचं, आपण डोकं चालवल्यावर, किती पैसे लागले, किती खर्च झाला, कशी मदत लागली, आपल्याकडे द्यायला आहे का काही, नाही ना, मग चौकशीच करायची नाही".

मी कार्यकर्त्यांचा...

'मी आतापर्यंत मोबाईलच विकत घेतला नाही, पेन सुद्धा दुसऱ्यानं दिला आहे, चष्मा देखील दुसऱ्यानं घेऊन दिला आहे. कपडे देखील आतापर्यंत मी स्वतः शिवले नाहीत. कुणापण कार्यकर्त्यांचं लग्न असलं की, टेलरकडे जातो, कपडे शिऊन आणतो, त्याचा हट्ट एकच असतो की, माझ्या कार्यक्रमाच्या दिवशी आपण कपडे घालावे. वैयक्तिक जीवन जगायला मला काहीच लागत नाही. काहीजण माझ्या घड्याळावर ट्रोल करतात, कार्यकर्त्यांनं मला दिलं ना, तुमचं अंग काय दुखतं, तुम्हाला कुणी हजार रुपयेचं घड्याळ दिलं का ते बघा ना, मला मोबाईल देखील कार्यकर्त्यांनी दिला आहे, त्यांचा माझ्यावर जीव आहे, म्हणून दिलं आहे ना', असे खासदार नीलेश लंकेंनी सांगितले. नीलेश लंकेंना 'नेते' म्हणून ओळखले जाते, त्यावर बोलताना, लोकं का बोलतात, हे मला माहित नाही. पण लोकं बोलतात. मी कधी, त्याचा विचार केला नाही, असे खासदार लंकेंनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT