Prataprao Dhakne BJP Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Prataprao Dhakne BJP : शरद पवारांचे निष्ठावान 'काका' अन् बावनकुळे एकाच व्यासपीठावर; आमदार राजळे नाराजीच्या चर्चांना फुटलं तोंड...

Prataprao Dhakne and BJP Minister Bawankule Appear Together in Shevgaon Ahilyanagar : शेवगाव इथं भाजपच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय देवाभाऊ कुस्ती स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले.

Pradeep Pendhare

Ahilyanagar political news : भाजपमध्ये असलेले प्रतापराव ढाकणे ऊर्फ काका 2014 मध्ये राष्ट्रवादीमध्ये आले. शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला. भाजपची लाट असताना त्यांनी घेतलेला हा निर्णय म्हणजे, राजकीय करिअर धोक्यात घालण्यासारखाच ठरला. पुढे झाले देखील तसेच! केंद्रात भाजपची सत्ता आली. आता राज्यात युती सरकार आले. गेली 15 वर्षे भाजप हे सत्तेत आहे. अजून पुढं साडेचार वर्षे भाजप महायुतीच्या माध्यमातून सत्तेत राहिल.

प्रतापराव ढाकणेंचा भाजप सोडण्याचा निर्णय, त्यांच्या सत्तेपासून लांब नेणारा ठरला. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. ढाकणे शरद पवारांचे निष्ठावान असेल, तर पक्षाची स्थिती पाहता, संघर्षाची आणि अस्तित्त्वाची आहे. यातच शेवगावमध्ये भाजपच्यावतीने आयोजित देवाभाऊ राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबरोबर ढाकणे एकत्र आले. त्यामुळे ढाकणे यांच्या भाजप प्रवेशाच्या अन् त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी आमदार मोनिका राजळे नाराज झाल्याच्या चर्चांना तोंड फुटलं आहे.

शेवगाव इथं भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्या पुढाकारातून देवाभाऊ कुस्ती स्पर्धा झाल्या. प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या हस्ते स्पर्धेचं पारितोषिक वितरण झालं. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे व जिल्हा परिषदेचे माजी सभापती अर्जुन शिरसाठ यांनी हजेरी लावली.

एनसीपी शरद पवार (Sharad Pawar) पक्षाचे प्रतापराव ढाकणे यांची भाजपच्या व्यासपीठावर लावलेली हजेरी सर्वाधिक चर्चेची ठरली. याचबरोबर त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी भाजप आमदार मोनिका राजळे समर्थकांमध्ये एकीकडे नाराजी पसरली. ढाकणे यांची ही भाजप जवळील त्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांना तोंड फोडणारी ठरली. भाजप नेत्यांबरोबर व्यासपीठावर एकत्र आल्यानंतर पक्ष प्रवेशाविषयी ढाकणे यांनी मौन बाळगून या गोंधळाच्या स्थितीला अधिकच फोडणी दिली.

विधानसभा निवडणुकीत भाजपचे मुंडे यांनी आमदार राजळे यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध करत स्वतः ला प्रचारापासून दूर ठेवले होते. भाजपमध्ये राजळे यांचे पक्षांतर्गत विरोधक म्हणून काम करणाऱ्या मुंडे यांनी आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेला आपल्याच पक्षाचे वरिष्ठ नेते येतात, हे आमदार राजळे समर्थकांना रुचले नाही.

राजळेंचे नाव टाळले

शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदार राजळे यांचे नाव सुद्धा निमंत्रण पत्रिकेवर नसल्याने त्यांच्या समर्थकांनी देखील स्पर्धेकडे पाठ फिरवली. मात्र या कार्यक्रमाला राज्यपातळीवरील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह ढाकणे व शिरसाठ यांनी हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

राजळे समर्थक मुंडेंच्या व्यासपीठावर

शिरसाठ यांच्या पत्नी आमदार राजळे गटाच्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. तालुक्याच्या राजकारणात शिरसाठ विखे समर्थक असले, तरीही त्यांनी राजळे यांच्याशी चांगले जुळवून घेतले होते. आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत ते उमेदवारीचे प्रबळ दावेदार असतानाही त्यांनी मुंडे यांच्या व्यासपीठावर हजेरी लावल्याने राजळे समर्थकांना ते चांगलेच खटकले आहे.

भाजप प्रवेशाची चर्चा

ढाकणे यांच्या भाजप प्रवेशाची मोठी चर्चा चालू असून, तालुक्याच्या बाहेर असलेल्या एका गडाच्या महंतांनी ढाकणे यांच्या भाजप प्रवेशासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना गळ घातल्याचे बोलले जात आहे. ढाकणे यांच्या काही कार्यकर्त्यांना ढाकणे यांनी सत्ताधारी पक्षात जावे, असे वाटते तर काहींचा मात्र ढाकणे यांनी आपल्याच पक्षात राहून राजळे विरोधकांची भूमिका बजवावी, असे वाटत आहे.

ढाकणेंचं सूचक मौन

ढाकणे या महिन्याच्या अखेरीस केदारेश्वर कारखान्यावर होणाऱ्या एका कार्यक्रमात भाजपमध्ये येणार असल्याचेही बोलले जात आहे. ढाकणे यांच्याविषयी अशी उलटसुलट चर्चा जोर धरत आहे. मात्र, ढाकणे यांनी मौन बाळगले आहे. काका तुमचे नेमके चाललं काय? असा प्रश्न त्यांच्या समर्थकांना पडून ते गोंधळून गेले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT