Shani Shingnapur Oil Scam Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shani Shingnapur Oil Scam : शनिमूर्तीवर ‘भेसळयुक्त तेल’? रॅकेटवर कारवाईसाठी तुकाराम मुंढेंकडे तक्रार; भाविकांच्या भूमिकेनं शनैश्वर ट्रस्टमध्ये खळबळ

Devotees Demand Strict FDA Action Over Alleged Adulterated Oil Scam At Maharashtra Famous Shani Shingnapur Temple : शनिमूर्तीवर ब्रॅन्डेड तेलाचा नियम कागदावरच राहिला असून, शनिमंदिरात संशयास्पद तेल विक्रीवर FDA आयुक्त तुकाराम मुंढेंनी लक्ष घालण्याची ग्रामस्थ आणि भाविकांची मागणी आहे.

Pradeep Pendhare

Fake Oil Scam Maharashtra : महाराष्ट्रातील प्रसिद्ध शनिशिंगणापूर मंदिर येथे भाविकांच्या श्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित भेसळयुक्त तेल विक्री रॅकेटचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मंदिर परिसरात अनेक वर्षांपासून काळ्या तिळाच्या तेलाच्या नावाखाली कमी दर्जाचे आणि संशयास्पद तेल विकले जात असल्याचा गंभीर आरोप होत असून आता ग्रामस्थांनी थेट अन्न व औषध प्रशासनाचे तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे.

महत्त्वाचे म्हणजे, नेवाशातील (Newasa) शनिशिंगणापूरच्या शनैश्वर देवस्थान ट्रस्ट प्रशासनाने 1 मार्च 2025 रोजी शनिमूर्तीवर केवळ ‘ब्रॅन्डेड’ तेल अर्पण करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला होता. मात्र जवळपास अनेक महिने उलटूनही या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूर्वी देवस्थान ट्रस्टमध्ये गावातीलच काही स्थानिक विश्वस्त असल्याने वाहनतळ, पूजासाहित्य आणि तेल विक्रीसंदर्भात अनेक हितसंबंध निर्माण झाले होते. त्यामुळे भाविकांकडून जादा दर आकारणे, पूजेसाठी अतिरिक्त पैसे घेणे आणि तेल विक्रीतील कथित फसवणूक थांबत नसल्याची चर्चा सातत्याने सुरू होती.

याच पार्श्वभूमीवर रासायनिक मिश्रण असलेल्या तेलामुळे शनिमूर्तीवर परिणाम दिसू लागल्याने देवस्थान प्रशासनाने ब्रॅन्डेड तेलाचा नियम लागू केला होता. या निर्णयानंतर स्थानिक तेल विक्री व्यवसायांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

दरम्यान 4 मार्च 2025 रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या अहिल्यानगरच्या कार्यालयातील तत्कालीन अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांच्या पथकाने पाच संशयास्पद कंपन्यांपैकी तीन कंपन्यांच्या तेलाचे नमुने ताब्यात घेत तपास सुरू केला होता. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे त्या तपासाचा अहवाल आजपर्यंत समोर आलेला नाही. पूर्वी मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा कर्मचारी भाविकांकडून आणल्या जाणाऱ्या तेलाची तपासणी करत होते. मात्र सध्या अशी तपासणी पूर्णपणे बंद झाल्याने पुन्हा संशयास्पद तेल मंदिरात जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे.

शनैश्वर ट्रस्ट FDAशी तक्रार करणार

शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, देवस्थानकडून विकले जाणारे तेल तपासणी करूनच उपलब्ध केले जाते. मात्र सुमारे 95 टक्के तेल बाहेरील दुकानांतून मंदिरात येत असल्याने त्या तेलाची शुद्धता तपासणे आवश्यक आहे. यासाठी अन्न व औषध प्रशासनाला अधिकृत पत्रव्यवहार केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तेल विक्रीतून भाविकांची लूट

दरम्यान भाविकांची फसवणूक केवळ तेलापुरती मर्यादित नसल्याचाही आरोप समोर आला आहे. शनिमूर्तीपर्यंत श्रीफळ, यंत्र, पादुका किंवा इतर वस्तू नेता येत नसतानाही काही ठिकाणी पूजा साहित्याच्या टोपलीत या वस्तू ठेवून जादा पैसे आकारले जात असल्याचे सांगितले जात आहे. काळ्या तिळाचे तेल म्हणून तब्बल एका लिटरमागे 500 रुपये घेतले जात असल्याचाही दावा करण्यात आला आहे.

भाविकांची तुकाराम मुंढेंकडे तक्रार

जळगावचे भाविक गणेश पाटील यांनी आता FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या संपूर्ण प्रकरणात स्वतः लक्ष घालून मोठी कारवाई करावी, अशी थेट मागणी केली आहे. शनिशिंगणापुरात सुरू असलेल्या या कथित तेल रॅकेटमुळे आता प्रशासन खरोखर जागे होणार का, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT