Nilesh Lanke Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nilesh Lanke News : आता नीलेश लंके काय करणार ? अजित पवारांचा इंटरेस्ट असलेल्या त्या लोकसभांत दक्षिण नगरचं नावच नाही

राजेंद्र त्रिमुखे

Nagar Latest News : गेल्या अडीच तीन वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेच्या तयारीला लागलेले पारनेरचे आमदार नीलेश लंके निवडणुक लढवणार का याची चर्चा सुरू असतानाच माध्यमातून आलेल्या चर्चेत अजितदादांनी महायुतीकडे एकूण 9 जागांची मागणी केल्याची चर्चा जोर धरत आहे. मात्र, सध्या माहिती मिळाल्यानुसार दक्षिण नगरचे नाव नसल्याने नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

चर्चेत आलेल्या या नऊ जागा कुठल्या आणि त्या जागांवर कोण उमेदवार संभाव्य असेल याची यादीही समोर येत आहे. वास्तविक यावर स्वतः अजित पवार वा त्यांच्या गटाच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याने आणि महायुतीच्या नेत्यांनी कोणतेही वक्तव्य केलेले नाही. मात्र सध्या राष्ट्रवादी पक्षाचे असलेले विद्यमान चार खासदारांचे लोकसभा मतदारसंघ आणि इतर पाच मतदारसंघावर अजित पवार यांचा राष्ट्रवादी गट दावा करत मागणी केल्याची चर्चा आहे.

यात संभाव्य उमेदवारांची नावेही पुढे येत असून, बारामतीमधून सुनेत्रा पवार, सातारामधून रामराजे नाईक निंबाळकर, रायगड मधून सुनिल तटकरे शिरूर मधून सध्या शिंदे गटात असणारे या मतदार संघातील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, दक्षिण मुंबईतून काँग्रेस मधील बडा चेहरा, परभणीतून राजेश विटेकर, भंडारा गोंदिया मधून प्रफुल्ल पटेल, धाराशिव मधून राणा जगजितसिंह (सध्याचे भाजप आमदार), छत्रपती संभाजीनगर मधून सतीश चव्हाण असे संभाव्य उमेदवार असतील अशी चर्चा सुरू झाली असली तरी याला अजित पवार गटाकडून पृष्ठी मिळालेली नाही.

एकूणच अजित पवार गटाबाबत समोर येत असलेल्या संभाव्य जागामध्ये नगर दक्षिण जागेचा उल्लेख नाही. नगर दक्षिणेची जागा नेहमीच राष्ट्रवादी पक्षाने आतापर्यंत लढवली आहे. 2019 ला पक्षाने आमदार संग्राम जगताप यांना भाजपच्या सुजय विखे यांच्या विरोधात मैदानात उतरवले होते. मात्र जगताप यांचा सुजय विखेंनी दणदणीत पराभव केला.

यानंतर साधारण तीन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीने आमदार निलेश लंके यांना तयारीला लागण्याचे सांगण्यात आल्याची खात्रीशीर वृत्त होते. लंकेंनी पण या दृष्टीने नगर दक्षिणेतील सहाही विधानसभा मतदारसंघात पूर्ण लक्ष घालून जनसंपर्क वाढवला आहे. नीलेश लंके किंवा त्यांच्या पत्नी राणी लंके या येथून संभाव्य राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवार असतील असेच बोलले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, अजितदादांनी घेतलेल्या वेगळ्या भूमिकेनंतर लंके अजित पवारांसोबत गेले. त्यामुळे लंके लोकसभेबाबत काय भूमिका घेतात, यावर लंके यांनी अजितदादा जो आदेश देतील त्यानुसार निर्णय घेऊ असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार यांच्याकडूनही. लंके यांच्या नावाची चाचपणी सुरूच असली तरी पर्यायी उमेदवार म्हणून रोहित पवार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदींची नावेही चर्चेत आहेत.

आता अजितदादांच्या चर्चेत आलेल्या लोकसभा उमेदवारांच्या संभाव्य यादीत दक्षिण नगर जागेचा उल्लेखच नसल्याचे दिसून येत असल्याने नगर दक्षिणेची जागा महायुतीनुसार भाजप आपल्याच ताब्यात ठेवणार असेल, तर नीलेश लंके काय भूमिका घेणार असा प्रश्न पुढे येत आहे. या दृष्टीने होणाऱ्या संभाव्य गोष्टींवर आता नक्कीच चर्चा सुरू होणार आहेत. यात लंके हे शरद पवार गटाकडे येत लोकसभा लढवणार का? यावर चर्चा अधिक होणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक जशी जवळ येईल त्याच बरोबर पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल काय लागतात याकडेही लक्ष असणार आहे.

SCROLL FOR NEXT