Nagar news : नगर जिल्ह्यात नेत्यांनी यंदा आयोजित केलेल्या दिवाळी फराळात गोड-धोड पदार्थांपेक्षा राजकीय धुरळाच जास्त उठला. भाजपचे नेते आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी त्यांच्या दिवाळी फराळाला सर्वाधिक राजकीय वास आला. आमदार शिंदे यांच्या फराळाच्या कार्यक्रमाला सायंकाळी उशिरा भाजप खासदार डॉ. सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी हजेरी लावली. खासदार विखेंनी आमदार शिंदेंना बालुशाही भरवत तोंड गोड केले. शिंदे आणि विखेंमधील अलीकडच्या काळात राजकीय द्वंद वाढले आहे. विखेंची शिंदेंचे केलेले गोड तोंड पुढील किती काळ टिकणार, याची चर्चा सध्या आहे.
नगर जिल्ह्यात राजकीय नेत्यांच्या दिवाळी फराळाचा कार्यक्रम जोरात सुरू आहेत. दिवाळीत फटाक्यांपेक्षा या राजकीय नेत्यांच्या दिवाळी फराळाच्या कार्यक्रमाचा आवाज जास्त घुमतो आहे. भाजपचे आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांचा काल दिवाळी फराळ झाला. याच दिवशी जिल्हा नियोजन समितीची बैठक होती. पालकमंत्री विखेंच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यानंतर विखेंनी नगर दक्षिणेसाठी जनता दरबार घेतला. यानंतर ते आमदार शिंदे यांच्याकडे दिवाळी फराळाला हजेरी लावतील, असे वाटत होते. परंतु कामाच्या व्यग्रतेमुळे त्यांना जमले नाही, असे सांगण्यात आले. खासदार सुजय विखेंनी मात्र शिंदेंच्या दिवाळी फराळाला हजेरी लावली. खासदार विखे आणि आमदार जगताप हे दोघेही शिंदेच्या दिवाळीला उपस्थित होते. आमदार जगातप यांच्या साक्षीने खासदार विखेंनी शिंदेंचे बालुशाही मिठाईने तोंड गोड केले.
खासदार विखे आणि आमदार शिंदे यांच्यातील द्वंद सर्वश्रुत आहे. आमदार शिंदे यांनी अलीकडच्या काळात 2024 ला भाजपकडून खासदारकी लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यातच विखेंचे कट्टर राजकीय विरोधर आमदार लंके यांच्याशीदेखील आमदार शिंदेंची सलगी वाढली आहे. विशेष म्हणजे, शिंदे-लंके यांनी दोघांच्या दिवाळी फराळाला हजेरी लावली. आमदार शिंदेंच्या दिवाळी फराळाला खासदार विखे यांनी हजेरी लावून आम्ही एकाच राजकीय पक्षातील कार्यकर्ते आहोत, असे सांगण्याचा प्रयत्न केला. शिंदेकडील दिवाळी फराळाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांनी लगेचच लंकेंच्या दिवाळी फराळाला हजेरी लावली. यामुळे खासदार विखेंनी शिंदेंचे गोड केलेले तोंड जास्त काळ टिकले नसल्याची चर्चा रंगली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आमदार राम शिंदे यांच्या दिवाळी फराळाला खासदार सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप हे एकत्र आले होते. या तिघांना एकच धागा जोडत असल्याचीही चर्चा आहे. विखे हे विद्यमान खासदार आहेत. त्यांनी 2019 मध्ये त्यांच्याविरोधात खासदारकी लढत असलेले आमदार जगताप यांचा पराभव केला होता. आता आमदार शिंदे हे भाजपकडून खासदारकीसाठी इच्छुक आहेत. तसेच आमदार नीलेश लंके यांचेदेखील नाव खासदारकीसाठी चर्चेत आहे. म्हणजेच, शिंदे-विखे-जगताप-लंके या चौघांना राजकीय नेत्यांना खासदारकीचा एकच धागा जोडत आहे. खासदारकीसाठी हे चौघे राजकीय नेते कोणत्याना कोणत्या कारणानी चर्चेत असतात.