Nilesh Lanke Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nilesh Lanke : निलेश लंके जिल्हाधिकाऱ्यांवर नाराज; थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, काय आहे कारण ?

Ahmednagar MIDC : अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे उद्योग बंद पडण्याची शक्यता

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar Political News : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पारनेरचे आमदार निलेश लंके सध्या चांगलेच तापले आहेत. दोन-तीन दिवसांपूर्वी त्यांनी जिल्हा परिषदेच्या कारभारावर आक्षेप घेतला होता. आता आमदार लंकेंनी जिल्हाधिकाऱ्यांवरील नाराजी जाहीर केली. जिल्हाधिकारी पारनेरमधील उद्योजकांना त्रास देतात, अशी तक्रारच लंकेंनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. यामुळे जिल्ह्यात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

आमदार लंकेंनी केलेल्या तक्रार पत्रात म्हटले, पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहत मोठ्या प्रमाणावर विकसीत होत आहे. गेल्या २५ वर्षापासून येथील औद्योगिक वसाहत सुस्थापित आहे. अनेक उद्योगांना येथे चालना मिळत असून येथील उद्योग प्रगतीपथावर आहेत. या उद्योगांमुळे जिल्ह्यासह स्थानिकांनाही मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे, असे सांगून या प्रगतीत जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ उद्योजकांवर दबाव टाकत असल्याचा आरोप केला आहे.

'एकीकडे सुपा एमआयडीसी प्रगती पथावर असताना जिल्हाधिकारी सालीमठ छोट्या मोठ्या उद्योजकांची उलट सुलट चौकशी सुरू केली आहे. आपल्या हितसबंधातील व्यक्तींना कामे देण्याचा आग्रह ते धरतात. कामे देण्यासाठी दबावतंत्राचाही वापर करण्यात येतो.जिल्हाधिकाऱ्यांच्या मर्जीप्रमाणे काम न झाल्यास कायद्याचा धाक दाखविण्यात येतो,' असा गंभीर आरोपही लंकेंनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'पारनेर-नगर तालुक्याचे प्रांताधिकारी गणेश राठोड यांना औद्योगिक वसाहतीमध्ये पाठवून कंपनीची उलट-सुलट चौकशी करण्यात येते. तहसिलदार गायत्री सैंदाणे यांनाही तोंडी आदेश देऊन औद्योगिक वसाहतीमध्ये पाठविले जाते. सैंदाणे सुद्धा चौकशीच्या नावाखाली उद्योजकांना वेठीस धरले जाते,' असेही आमदार लंकेंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या तक्रार अर्जात निदर्शनास आणून दिले आहे.

उद्योजक वैतागले ?

महसूल विभागाचे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला अनेक उद्योजक आता वैतागले आहेत. अधिकाऱ्यांकडून त्यांचा मानसिक छळ करण्यात येत असल्याचे आमदार लंकेंचे म्हणणे आहे. अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे उद्योग बंद पडण्याची शक्यता आहे. तसेच नवे उद्योजकही येथे येण्यास धजावणार नाहीत, भीतीही लंकेंनी व्यक्त केली.

..तर जिल्हाधिकारी जबाबदार

महसूल विभागाच्या जाचामुळे औद्योगिक वसाहतीची पिछेहाट झाली, उद्योग बंद पडले तर त्यास जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसिलदार हे पूर्णपणे जबाबदार असणार आहेत. त्याचा गांभीर्याने विचार करून कार्यवाही करण्याची आवाहनही आमदार निलेश लंकेंनी केले आहे. यावर मुख्यमंत्री शिंदेंसह उपमुक्यमंत्री फडणवीस आणि पवार काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT