MP Nilesh Lanke Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Six Lane Highway : नीलेश लंके यांचा नितीन गडकरींकडे 220 किमीचा प्रस्ताव : संभाजीनगर-अहिल्यानगर-पुणे महामार्ग सहापदरीची मागणी

MP Nilesh Lanke urges Nitin Gadkari to approve six-laning of NH 753F connecting Chhatrapati Sambhajinagar, Ahilyanagar and Pune : छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर-शिरूर-पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडी व अपघातांचा मुद्दा उपस्थित; फ्लायओव्हर, सेवा रस्ते आणि पूरक सुविधांनाही मंजुरी देण्याची विनंती.

Pradeep Pendhare

Nilesh Lanke demands six lane NH 753F : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753-एफ अर्थात छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर-शिरूर-पुणे या सुमारे 220 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे सहापदरी सिमेंट-काँक्रीट रस्त्यात रूपांतर करण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

नवी दिल्लीत गडकरी यांची भेट घेऊन त्यांनी या महत्त्वाच्या महामार्गाच्या सर्वांगीण विकासासाठी तातडीने प्रशासकीय मंजुरी देण्याची विनंती केली.

खासदार लंके यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे हे राज्यातील औद्योगिक, शैक्षणिक, वैद्यकीय आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र असून मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातून दररोज हजारो नागरिक या मार्गाचा वापर करतात. मात्र, शिरूर ते छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) दरम्यानचा महामार्ग अनेक ठिकाणी अरुंद, खड्डेमय आणि जीर्ण अवस्थेत असल्याने वारंवार वाहतूक कोंडी होत असून अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी शिरूर-पुणे फ्लायओव्हर प्रकल्पाला गती दिल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे आभार मानत, उर्वरित संपूर्ण महामार्गाचाही विकास त्याच धर्तीवर करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.

राष्ट्रीय महामार्ग 753-एफवर श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर, श्री ज्ञानेश्वर माऊली मंदिर (नेवासा), शिर्डी, देवगड, थेऊर गणपती आणि रांजणगाव गणपती ही प्रमुख तीर्थक्षेत्रे आहेत. तसेच वाळूज, नेवासा, अहिल्यानगर, सुपा, रांजणगाव, शिक्रापूर, चाकण आणि तळेगाव ही महत्त्वाची औद्योगिक केंद्रेही या मार्गावर आहेत.

या महामार्गाचे सहापदरीकरण झाल्यास धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल. त्याचबरोबर उद्योग, शेतीमालाची वाहतूक, गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि ग्रामीण विकासालाही गती मिळेल, असा दावा खासदार लंके यांनी केला आहे.

महामार्गाच्या संपूर्ण 220 किलोमीटर मार्गाचे सहापदरी सिमेंट-काँक्रीटीकरण, आवश्यक ठिकाणी फ्लायओव्हर, सेवा रस्ते आणि इतर पूरक सुविधांच्या कामांना प्राधान्य देत तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणीही खासदार नीलेश लंके यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास मराठवाडा, अहिल्यानगर आणि पुणे या तीन महत्त्वाच्या विभागांतील दळणवळण अधिक सुरक्षित, जलद आणि सक्षम होण्यास मदत होणार असून आर्थिक विकासालाही मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT