Ahilyanagar News: विधानसभा निवडणुकीत संधी आणि ताकद दोन्हीही असूनही भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांना कोपरगाव निवडणुकीत माघार घ्यावी लागली होती.आता भाजपकडून विधान परिषदेला कोल्हे यांना संधी देण्यात आली होती. बिनविरोध निवडणूक झाल्यानंतर कोल्हे यांच्या गळ्यात अखेर विधान परिषदेची आमदारकीची माळ पडली आहे. आमदारकी मिळालेल्या कोल्हे यांची शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदारानं मध्यरात्री भेट घेतली आहे.
अहिल्यानगरच्या राजकारणात रविवारी(ता.17 मे) मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी भाजपचे नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार विवेक कोल्हे यांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.
खासदार निलेश लंके यांनी कोपरगाव येथे रविवारी मध्यरात्री आमदार विवेक कोल्हे यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण दोन्ही नेत्यांमध्ये भेटीदरम्यान काय चर्चा झाली हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.
भाजपचे विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार विवेक कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके हे दोन्ही नेते अहिल्यानगरच्या राजकारणातील दांडगा संपर्क असलेले नेते मानले जातात. या दोन्ही नेत्यांची जशास तसं आणि आक्रमक शैली ही ओळख आहे.
पण खासदार निलेश लंके आणि आमदार विवेक कोल्हे हे दोन्ही नेत्यांचं अहिल्यानगरच्या राजकारणावर कमांड असलेल्या विखे गटाशी फारसं सख्य नसल्याचंही सर्वश्रुत आहे. याच पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांमध्ये तासभर झालेल्या भेटीत काय खलबतं झाली याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.
पण कोल्हे आणि लंके यांच्या समर्थकांकडून ही 'सदिच्छा भेट' असल्याची माहिती देण्यात आली आहे. विवेक कोल्हे हे विधान परिषदेवर निवडून गेल्यामुळे त्यांचं अभिनंदन करण्यासाठी लंकेंनी ही भेट घेतल्याचा दावा करण्यात येत आहे. पण मध्यरात्री कोपरगाव गाठत लंकेंनी कोल्हेंची घेतलेली भेटीमुळे राजकीय वर्तुळात कुजुबुज सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.