Uddhav Nimse & Farmers agitation at NMC Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Corruption: नाशिक महापालिकेत 300 कोटींचा घोटाळा? भाजप नेत्याचा बॉम्ब!

Sampat Devgire

NMC Corruption News: नाशिक महापालिका आयुक्त अशोक करंजकर यांनी एका रात्रीत बिल्डरच्या जमिनीला ५५ कोटी रुपये दिले. त्यावरून उठलेले आरोपांचे वादळ आता सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांवरही घोंघाऊ लागले आहे. आज याबाबत शेतकरी थेट आयुक्तांच्या केबीनमध्ये धडकले.

महापालिकेत आठशे कोटींचा भूसंपादन घोटाळा झाला असा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला होता त्याला आता महायुतीच्या नेत्यांकडूनच दुजोरा मिळू लागला आहे. सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी बिल्डरांच्या जमिनीचा मोबदला देऊन ३०० कोटी रुपये खाल्ले, असा गंभीर आरोप केला.

भाजप नेत्यांनीच हा आरोप केला आहे. महापालिका आयुक्तांविरोधात यासंदर्भात शेतकऱ्यांनी आज अचानक आक्रमक होत आंदोलन केले. हे शेतकरी आयुक्तांच्या केबिनमध्ये शिरले. प्रचंड घोषणाबाजी झाली. त्यामुळे महापालिका भ्रष्टाचाराची दुर्गंधी आता सर्व दूर पसरू लागली आहे.

महापालिका प्रशासकांवर राज्यातील सत्ताधारी आणि मंत्र्यांचे नियंत्रण असते. त्यामुळे हे आरोप थेट भारतीय जनता पक्ष आणि संबंधित मंत्र्यांकडे अंगुली निर्देश करतात. लोकसभा निवडणुकी दरम्यान खासदार राऊत यावर बोलले होते. आता थेट भाजपच्या नेत्यांने त्या आरोपाची पुनरावृत्ती केली.

चार दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त करंजकर यांनी एका रात्रीत ५५ कोटी रुपयांचा धनादेश भूसंपादनासाठी अदा केला. हे भूसंपादन करू नये, असा आदेश मंत्र्यांनी दिला होता. हे प्रकरण न्यायालयातही न्यायप्रविष्ट होते. असे असताना आयुक्तांनी अन्य अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून हे धनादेश अदा केले.

नाशिक शहरात भूसंपादन करताना मोठे घोटाळे झाले आहेत, असा आरोप सातत्याने केला जातो. भारतीय जनता पक्षाचे नेते गणेश गीते तसेच सध्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटात असलेल्या काही माजी नगरसेवकांवर याबाबत आरोप झाले होते. त्याला दुजोरा देण्याचे काम भाजपचे नेते उद्धव निमसे यांनी केले आहे.

दुपारी संताप्त शेतकऱ्यांनी माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर धडक दिली. हे शेतकरी २००३ मध्ये संपादित सिंहस्थासाठीच्या शेतकऱ्यांच्या जमिनींचे मोबदले न मिळाल्याने संतप्त होते. बिल्डरांच्या जमिनींना ताबडतोब पैसे अदा करण्यात येतात. यामध्ये स्पष्टपणे भ्रष्टाचार झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. प्रशासनातील अधिकारी आणि सत्ताधारी पक्षाचे राजकीय नेते हे सर्व त्यात सहभागी असल्याचे संतप्त शेतकऱ्यांनी सांगितले.

यावेळी श्री निमसे यांनी आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून भाजपमध्ये आलो. मात्र निराशा झाली आहे. सत्ताधारी पक्ष बिल्डर धार्जिने आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष केले आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून वीस वर्षे झाली. मात्र त्यांना पैसे दिले जात नाही.

महापालिकेमध्ये गेल्या काही दिवसात आठशे ते नऊशे कोटींचे भूसंपादन झाले. त्यात दुप्पट दर दाखविण्यात आले ३०० कोटी रुपये महापालिकेतील अधिकारी आणि सत्ताधारी पक्षाच्या सरकारमधील मंत्री आणि नेत्यांनी हडप केले. असा अत्यंत गंभीर आरोप यावेळी निमसे यांनी केला

आजच्या आरोपाने खळबळ उडाली आहे. महापालिका प्रशासनालाही खडबडून जाग आली. त्यांनी घाई गडबडीत एक पत्रक काढले. त्यात दसत, पंचक आणि नांदूर परिसरातील भूसंपादनाच्या प्रक्रियेवर तातडीने कार्यवाही केली जाईल, असे म्हटले. मात्र यानिमित्ताने महापालिका आयुक्त करंजकर यांनी ५५ कोटींचा केलेला वादग्रस्त निर्णय आणि सत्ताधारी पक्षाचा भूसंपादन घोटाळा यातील भ्रष्टाचाराने नाशिक शहरातील नागरिकांमध्ये संताप पसरला आहे.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT