Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Shinde : घाबरलो म्हणून फिरत नाही, तर कामातून उत्तर देतोय; मुख्यमंत्र्याचा विरोधकांना टोला

कैलास शिंदे

Eknath shinde in Jalgaon : मुख्यमंत्र्यांना आमदार जाण्याच्या भिती आहे. त्यामुळे घाबरलो असून राज्यभर फिरत असल्याची टीका विरोधक करतात. मात्र आपण मुळीच घाबरलेलो नाही. सर्वसामान्यांच्या हितासाठी हे सरकार स्थापन केले आहे.

सर्वसामान्यांची कामे करून विरोधकांच्या टीकेला उत्तर देत आहोत. त्यामुळे त्यांना आपण सतत जनतेचे काम करताना दिसत आहे. तसेच जनतेचाही आपल्याला प्रतिसाद मिळत आहे, असा विरोधकांना टोला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.

जळगाव जिल्ह्यातील भोकर (Jalgaon) येथे तापीनदीवर उभारण्यात येणाऱ्या पुलाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार लता सोनवणे, आमदार सुरेश भोळे, संजय सावकारे, अनिल पाटील, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, खासदार रक्षा खडसे, उन्मेश पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले की, मुख्यमंत्री साध्या उदघाटनाच्या कार्यक्रमासही हजर राहत आहेत. त्यांना आपले आमदार उध्दव ठाकरे यांच्या बाजूला जातील याची मुख्यमंत्र्यांना भिती वाटत आहे काय? अशी विरोधक टीका करीत आहेत.

महाजन यांच्या बोलण्याचा हाच धागा पकडून मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले, की काय म्हणतात विरोधक मी घाबरलो, म्हणून फिरतो आहे! विरोधकांच्या अशा टीकेला आपण उत्तर देणार नाही. परंतु आपण त्यांना आपल्या कामातून उत्तर देत आहोत.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "आपले सरकार स्थापन होवून सात महिने झाले. शपथ घेतल्यानंतर आपण सतत जनतेसाठी काम करत आहे. सर्व सामान्य जनता, शेतकरी यांच्या हिताचे निर्णय घेत आहोत. केवळ आम्ही जनतेचा अजेंडा घेवून काम करीत आहोत, आमचा कोणताही वैयक्तीक अजेंडा नाही. आपल्या सततच्या कामामुळे जनतेचाही उदंड प्रतिसाद आपल्याला मिळत आहे, हे कामच विरोधकांच्या टीकेला उत्तर आहे."

शेतकरी जगला पाहिजे

संपूर्ण राज्याची गरज ओळखून आपण विकासाची कामे करीत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. ते म्हणाले, "समृध्दी महामार्ग हा एक आज चमत्कार ठरतो आहे. आज नागपूर-मुबंईच्या वेळेचे अतंर कमी झाले आहे. त्यामुळे उद्योग, व्यससायाला विकासाची दारे उघडी झाली आहेत. आपले सरकार हे सकारात्मक आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी योजना राबवित आहोत. शेतकरी जगला पाहिजे, हेच सरकारचे धोरण आहे. त्यामुळे एनडीआरएफच्या निकषाच्या बाहेर जावून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. राज्यात ३८ हजार पिण्याच्या योजना राबविल्या आहेत."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT