Ahmednagar News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रा अहमदनगरमध्ये येताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सभेतून आमदार संग्राम जगताप यांचं नाव न घेता जोरदार निशाणा साधला.
आमदार जगतपांचे नाव न घेता जयंत पाटील (Jayant Patil) यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, "विषय जुना... बघितली. नगरमध्ये गुंडगिरी व ताबेमारी वाढली आहे. काही व्यापारी मला भेटले, तेही सुरक्षित नाहीत. अशा स्थितीत रोज सकाळी, विषय जुना... कशाला करता? आमची सत्ता आल्यावर तुम्हाला नवा विषय आम्ही देऊ, असे स्पष्ट म्हणत, त्यांना भीती आहे की, विखेंसारख्या नेत्याचा पराभव होऊ शकतो, तर आपले काय? म्हणून त्यांचा सारा खटाटोप सुरू आहे".
जयंत पाटील म्हणाले, "नगरची जनता सूज्ञ आहे. लोकसभेला त्यांनी बलाढ्य शक्तीचा पराभव केला. जनशक्तीने धनशक्तीचा पराभव केला. हेच आता विधानसभेत करायचे आहे. लोकसभेवेळी महायुती सरकार हवेत होते. ते आता जमिनीवर आले आहे. पाहिजे त्या घोषणा करीत आहे. पण त्या पूर्ण करण्यासाठी पैसे नाहीत, असा दावा करत, महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर यांच्यापेक्षा उत्तम योजना आम्ही आणू आणि त्या पूर्ण करून दाखवू". राज्यात महिला सुरक्षित नाहीत. सरकारचे प्रशासनावर नियंत्रण व वचक नाही. जनताही सुरक्षित नाही. त्यामुळे आम्ही कायद्यात दुरुस्ती करू व पोलिसांवर जबाबदारी निश्चित करून महिलांना सुरक्षित करू, अशी ग्वाही जयंत पाटील यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीवेळी सत्ताधार्यांच्या कोणत्याही घोषणा नव्हत्या. मात्र, आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना जे लाडके नव्हते, तेही आता लाडके होऊ लागले आहेत. पण सत्ताधार्यांचे हे लाडके प्रेम केवळ लाडक्या खुर्चीसाठी आहे, असा घणाघात शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. दरम्यान, राज्यावर 8 लाख कोटींचे कर्ज असून, सत्ताधार्यांकडे घोषणा पूर्ण करण्यासाठी पैसे नसल्याने रिझर्व्ह बँकेकडे कर्ज मागितले आहे, असा दावाही जयंत पाटील यांनी केला.
महाविकास आघाडीचे जागा वाटप झाले नसल्याने आज उमेदवारी जाहीर करू शकत नाही. पण महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांच्या स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी आपल्यात स्पर्धा करू नये. महाविकास आघाडी म्हणूनच संघटित ताकद निर्माण करावी, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले. दरम्यान, मधुकरराव पिचड ज्येष्ठ नेते शरद पवारांना का भेटले, हे माहीत नसल्याचे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.