Maharashtra Politics Latest Updates : पाथर्डीतील मढी ग्रामपंचायतीने कानिफनाथ यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदीच्या केलेल्या ठरावावरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघू लागले आहे. जिल्हा प्रशासनाने हा ठराव रद्द केला असला, तरी तो पुन्हा घेण्याची तयारी ग्रामपंचायतीने केली आहे.
हिंदू सभा घेऊन भाजप मंत्री नीतेश राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी समर्थन दिले आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस प्रतापराव ढाकणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधत मार्ग काढण्याची मागणी केली आहे.
प्रतापराव ढाकणे यांनी सुरवातीपासून मढी ग्रामपंचायतीच्या ठरावावर नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयीन लढाई लढण्याचा इशारा दिला होता. प्रशासनाने हा ठराव रद्द केला असला, तरी तो पुन्हा घेण्याची तयारी मढी ग्रामपंचायतीचे सरपंच संजय मरकड यांनी भूमिका घेतली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे सरचिटणीस प्रतापराव ढाकणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधले आहे.
प्रतापराव ढाकणे म्हणाले, "यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मढीच्या यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांच्या बंदीच्या निर्णयात हस्तक्षेप करावा. दोन्ही बाजूने समन्वय साधून यंदाच्या यात्रेचे नियोजन प्रशासनाद्वारे करावे".
भाजपचे मंत्री नीतेश राणे यांनी केलेल्या भाषणावर ढाकणे यांनी आक्षेप घेतला. प्रशासनाने मढीचा रद्द केलेला ठराव पुन्हा घ्यावा आणि त्यावेळेस आडवे येणाऱ्यांना आपण पाहू, असे मंत्री राणे यांचे भाष्य म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दहशत बसवण्याचा प्रकार असल्याचा आरोप ढाकणे यांनी केला.
पाथर्डी तालुक्यातील मढी इथं कानिफनाथ यात्रेला 13 मार्चपासून सुरू होत आहे. या यात्रेला सातशे वर्षांची परंपरा आहे. कोणताही हिंदू-मुस्लिम वाद नाही. मंत्री राणे यांनी विधानाने परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने या विषयात लक्ष घालणे गरजेचे आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी देखील दोन्ही बाजूंनी समन्वय साधावा आणि यात्रा उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार न होता, यात्रा सुरळीत पार पडावी या उद्देशाने प्रयत्न करावेत, अशी मागणी ढाकणे यांनी केली.
मढीच्या ग्रामसभेने मुस्लिम व्यापाऱ्यांच्या बंदीच्या ठरावास पाथर्डी-शेवगावच्या आमदार मोनिका राजळे यांचाही विरोध असावा. तसेच घटनाविरोधी ठराव केला, असतानाही प्रशासनाला याचे गांभीर्य नाही. तो ठराव प्रशासनाने रद्द केला असला तरी असा घटनाविरोधी ठराव केल्याबद्दल संबंधित सरपंच आणि ग्रामसेवकाला निलंबित करून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करायला हवेत, अशी मागणी प्रतापराव ढाकणे यांनी केली.
मढी ग्रामसभेने केलेल्या त्या ठरावाविरोधात मुकद्दर पठाण आणि फिरोज शेख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका केली आहे. त्याची प्राथमिक सुनावणी येत्या गुरूवारी (6 मार्च) होणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.