MLA Dilip Bankar, Pimpalgaon Bazar Samiti 
उत्तर महाराष्ट्र

Pimpalgaon Bazar Samiti : आमदार दिलीप बनकरांच्या सत्तेला खरंच सुरुंग? टोकनचा तिढा अन् सहा संचालकांची खेळी; जाणून घ्या इनसाइड स्टोरी...

MLA Dilip Bankar, Pimpalgaon Bazar Samiti : सहा संचालक अचानक गायब झाले असून आमदार दिलीप बनकरांच्या सत्तेला सुरुंग लागणार अशी चर्चा पसरवली गेली आहे. जाणून घेऊ या मागची इनसाइड स्टोरी...

Ganesh Sonawane

Nashik Politics : राष्ट्रवादीचे निफाड तालुक्याचे आमदार दिलीप बनकर यांचे वर्चस्व असलेल्या पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होऊन जवळपास आता सव्वातीन वर्षाचा काळ लोटला आहे. आता पावणे दोन वर्ष शिल्लक असताना बाजार समितीत सत्तांतर होणार असल्याच्या चर्चांणा पुन्हा एकदा उधाण आलं आहे.

सहा संचालक अचानक गायब झाले असून ते विरोधी गटात जाऊन बनकर यांच्या सत्तेला सुरुंग लावणार असल्याची चर्चा आहे. पण खरंच असं काही आहे का? पिंपळगाव बाजारसमितीत खरंच सत्तांतर होणार का? यामागची इनसाईड स्टोरी काय आहे ते जाणून घेऊ.....

विरोधी गटाकडून फेब्रुवारी महिन्यात बनकर यांच्या गटातील संचालक फोडण्याचा प्रयत्न झाला होता. त्यासाठी सहा संचालकांना टोकन देण्यात आलं होतं. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीनंतर समीकरणे बदलली. त्यामुळे विरोधी गटाची उरलेल्या पावणे दोन वर्षाच्या कालावधीसाठी सत्तांतर करण्याची मानसिकता राहिलेली नाही. म्हणून फेब्रवारीत संचालकांना जे टोकन देण्यात आलं होतं, ते टोकन विरोधी गटाने परत मागितलं अन् तिथूनच बाजारसमितीमध्ये राजकीय घडामोडींनी नाट्यमय वळण घेतलं आहे.

आता मिळालेलं टोकन परत करावं लागू नये म्हणून या सहा संचालकांनी वेगळीच खेळी केली. त्यांनी विरोधी गटाला सांगितलं टोकन कशाला परत घेता उरलेलं जे काही ठरलं होतं देऊन टाका आम्ही तुमच्यासोबत येतो. पण मुळात विरोधी गटातच आता फूट पडली आहे, त्यात विधानपरिषद निवडणुकीनंतर समीकरणे बदलली असल्याने विरोधी गटाला सत्तांतर करण्यात कोणताही रस नसल्याचं समजतं. म्हणून विरोधी गटाने दिलेलं टोकन परत मागितलं.

सूत्रांच्या माहितीनुसार, या सहा संचालकांकडून आता आमदार दिलीप बनकर यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांनी बनकरांची भेट घेऊन आम्हाला विरोधी गटाकडून बोलावलं जातंय. आम्ही तिकडे गेलो तर सत्तांतर होईल अशी धमकीच जणू दिली. यामागे, सोडून न जाण्याच्या बदल्यात विरोधकांना परत करावयाच्या टोकनच्या अमाउंटमध्ये काहीतरी तडजोड होईल अशी आशा या संचालकांना असावी, असे सांगितले जात आहे.

मात्र, आमदार बनकरांनी या संचालकांना तुम्हाला जायचं असेल तर खुशाल जा...तुम्ही माझ्यावर अविश्वास आणण्याआधीच मी राजीनामा देऊन टाकेल. ही शेतकऱ्यांसाठीची संस्था आहे. मी काय इथे पैसे कमवायला बसलो नाही. शेतकऱ्यांसाठी माझ्यासोबत राहायचं असेल तर रहा असं बनकरांनी संचालकांना स्पष्टपणे सांगितल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

मग सभापती असलेले दिलीप बनकर आपले ऐकत नाही. आपल्या धमक्यांचा त्यांच्यावर काही परिणाम होतच नाही हे बघितल्यावर या सहा जणांनीच आपण गायब झाल्याच्या व बाजार समितीत सत्तांतर घडून दिलीप बनकर यांच्या सत्तेला सुरुंग लागणार अशा अफवा पसरवल्याचे बोलले जात आहे.

कारण या सहा जणांवर विरोधी गटाला टोकन परत करण्याचा दबाव आहे. विरोधी गट आता सत्तांतरासाठी इच्छुक नाही. फक्त पावणे दोन वर्ष उरल्याने विरोधकांना इतका खटाटोप करण्यात रस नाही. त्यात संख्याबळ जुळलं नाही तर फसगत होण्याची शक्यता आहे. कारण विरोधी गटातील दोन संचालक बनकरांसोबत आहेत. मग अशा परिस्थितीत या सहा संचालकांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. (Nashik Politics)

टोकन परत करण्याचा दबाव असल्याने या संचालकांनी स्वत:च अफवा परवण्याचं काम सुरु केलं आहे. त्यामुळे हे संचालक खरच फुटून विरोधी गटाला जाऊन मिळणार का? बाजार समितीत खरंच सत्तांतर होणार का? की यांच्याकडून घेऊन ते त्यांना टोकन परत करणार? की आपआपल्या खिशातूनच हे टोकन परत करणार? नेमकं काय घडणार? अशा खमंग चर्चा सध्या बाजार समितीच्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT