Shalarth ID Scam : राज्यभर गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. या घोटाळ्यात अटकेत असलेले जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे संस्थाचालक व भाजप पदाधिकारी संजय गरुड याच्या जामीन अर्जावर नाशिक रोड अतिरिक्त सत्र न्यायालयात सुनावणी होणार होती. परंतु सुनावणी होण्यापूर्वीच गरुड यांनी जामीन अर्ज माघारी घेतला आहे.
संजय गरुड यांनी नाशिक रोड अतिरिक्त सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जावर गुरुवारी (दि. २७) सुनावणी होणार होती. या सुनावणीत न्यायालयाकडून अंतिम निर्णय दिला जाण्याची शक्यता होती. मात्र, सुनावणीपूर्वीच त्यांनी वकिलामार्फत आपला जामीन अर्ज मागे घेतल्याने या प्रकरणात ट्विस्ट वाढला असून चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, आठ महिन्यांपासून नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात असलेल्या माजी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनींच्या जामीन अर्जावरील सुनावणी ३ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे उपासनीचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. तर, संजय गरुड यांचे नातेवाईक दीपक गरुड यांच्या जामिनावर शुक्रवारी (दि. २८) सुनावणीची शक्यता आहे.
संजय गरुड यांना नाशिक पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील फार्म हाउस येथून २७ जुलै रोजी मध्यरात्री अटक केली होती. न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावली. परंतु त्यबेत बिघडल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली गरुड हे जिल्हा रुग्णालयातच आहेत. चौकशीतून या घोटाळ्यातील बडे मासे हाती लागू नये म्हणून गरुड यांना रुग्णालयातच ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची देखील चर्चा आहे.
वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात असलेल्या गरुड यांनी जामिनासाठी नाशिक रोड अतिरिक्त सत्र न्यायालयात धाव घेतली होती. गेल्या आठवड्यात सुनावणी होऊन सरकार पक्ष आणि बचाव पक्षातर्फे युक्तिवाद होऊन त्यावर गुरुवारी सुनावणी होणार होती. परंतु न्यायालयात सुनावणी होण्यापूर्वीच गरुड याच्या वकिलांकडून जामीन अर्ज काढून घेत माघार घेतली आहे. यामुळे गरुड यांचा जामीन लांबणीवर गेला असून मुक्काम नक्की जिल्हा रुग्णालयातच राहणार की कारागृहात हे पुढच्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
नाशिक रोड पोलिस ठाण्यात मार्चमध्ये शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. सुमारे १६० कोटी रुपयांच्या या घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालक संशयित भाऊसाहेब चव्हाण यांच्यासह चौदा संशयित आरोपींचे जामीन अर्ज नाशिकरोड अतिरिक्त न्यायालयाने यापूर्वीच फेटाळले आहेत. त्यामुळे या संशयितांवर अटकेची तलवार कायम असल्याने अटकेपासून बचावासाठी यातील काही संशयितांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावरील सुनावणी शनिवारी (दि. २९) उच्च न्यायालयात आहे. याकडे उत्तर महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.