PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी काळाराम मंदिरात जाऊन पूजा केली. देशाच्या इतिहासात नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट देणारे ते पहिले पंतप्रधान असून त्यांनी नाशिककरांची मने जिंकली, असे केंद्रीय महिला व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिकचा दौरा नुकताच संपला.
या दौऱ्यासाठी गेला आठवडाभर मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) परिश्रम घेत होत्या. या दौऱ्याचे अतिशय बारीक नियोजन राजकीय आणि प्रशासकीय दृष्टीने करण्यात आले होते. त्यासाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याच्या विविध यंत्रणा सक्रिय होत्या. त्याचे परिणाम आजच्या दौऱ्यात दिसून आले. हा दौरा यशस्वी झाल्याची प्रतिक्रिया प्रशासनाकडून व्यक्त झाली आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार 'सरकारनामा'शी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, आजच्या कार्यक्रमांमध्ये युवक महोत्सव आणि रोड शो हे प्रमुख कार्यक्रम होते. त्यावर केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व इतरांनी अतिशय बारीक नियोजन केले होते. मी स्वतः गेले चार दिवस नाशिकमध्येच थांबून होते. केंद्राची विशेष टीम युवक महोत्सवासाठी काम करीत होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्याचे परिणाम पंतप्रधान यांचा हा दौरा यशस्वी होण्यात झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनेदेखील त्याचा लाभ होईल, अशा कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया माझ्याकडे आल्या आहेत. आजच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी रामतीर्थला भेट दिली. काळाराम मंदिरात जाऊन त्यांनी पूजा केली. स्तोत्र म्हटले. मंदिरात सफाई केली. काळाराम मंदिर हे नाशिकचे आराध्य आहे. स्वातंत्र्यानंतर या मंदिराला भेट देणारे मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान आहेत.
मंदिराला भेट देऊन त्यांनी नाशिककरांची मने जिंकली आहेत. त्यामुळे नाशिकच्या नागरिकांमध्ये एक वेगळा आणि अनुकूल संदेश गेला आहे, याचे मला विशेष समाधान वाटते. आज नाशिकच्या सभेत पंतप्रधान मोदी यांनी देशासाठी आगामी काळात होणाऱ्या विविध प्रकल्पांची माहिती दिली आहे.
विशेषतः युवकांसाठी आगामी काळ भारतीय जनता पक्षाचे सरकार अधिक चांगले उपक्रम घेऊन येणार असून युवकांना विविध क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी देण्यासाठी पंतप्रधान मोदी अतिशय उत्सुक आहेत. विविध क्षेत्रांत युवकांची कामगिरी करण्यासाठी हा दौरा फलद्रुप ठरेल, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.