Ahmednagar Police Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar News: थरारक ! आरोपीने पोलिसांवरच रोखले पिस्तूल; स्वसंरक्षणासाठी पोलीस निरीक्षकाचा आरोपीच्या पायावर गोळीबार

Ahmednagar Police News: जामखेड पोलिसांनी तीन आरोपींना केलं अटक

सरकारनामा ब्यूरो

राजेंद्र त्रिमुखे :

Ahmednagar News : जामखेड शहरातील तपनेश्वर भागातील कार चालकाच्या डोक्याला पिस्टल लावून कार पळवली. सदर माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी आरोपी शोधण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांना खर्डा रस्त्यावर एका हॉटेल समोर तीन आरोपी बसलेले दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताना झालेल्या झटापटीत दोन पोलीस किरकोळ जखमी झाले.

यादरम्यान, एका आरोपीने आपल्याकडे असलेल्या पिस्टलमधून पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी स्वसंरक्षणासाठी आरोपीच्या पायावर गोळीबार करून तीनही आरोपी ताब्यात घेतले. दरम्यान, तात्काळ जखमी आरोपीला नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत.

जामखेड पोलिसांत पोलीस कॉन्स्टेबल संतोष नामदेव कोपनर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. या घटनेत प्रताप ऊर्फ बाळा हनुमंत पवार, शुभम बाळासाहेब पवार, काकासाहेब उत्तम डुने सर्व (रा.सारोळा ता.जामखेड) आरोपी निष्पन्न झाले आहेत.

जामखेड शहरातील तपनेश्वर रोडवर अदनान जहर शेख, (रा.तपश्वररोड, जामखेड ता.जामखेड) यांच्या डोक्याला पिस्टल लावून त्यांच्या ताब्यातील चारचाकी वाहन (एमएच 12 केटी 4795) बळजबरीने चोरून नेल्याची फिर्याद दाखल आहे.

असा घडला थरार !

जामखेड ते खर्डा रोडलगत असलेले हॉटेल साई समोरील मोकळ्या जागेत आरोपी नामे प्रताप ऊर्फ बाळा हनुमत पवार याने त्याच्या कमरेला असलेल पिस्टल बाहेर काढून हातातील पिस्टल फायर करण्याच्या उद्देशाने पोलिसांच्या दिशेने रोखून, पिस्टलचे ट्रिगर दाबून गोळी फायर करण्याचा प्रयत्न केला.

परंतु त्याच्या पिस्टलमधील गोळी फायर झाली नाही. त्याचवेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी आरोपी प्रताप ऊर्फ बाळा हनुमंत पवार व त्याचे साथीदार यांना पिस्टल खाली टाकून सरेंडर करण्यास सांगितले असतानाही आरोपीने पिस्टलमधून फायर करण्याच्या उद्देशाने पिस्टल पुन्हा कॉक करण्याचा प्रयत्न केल्याने तसेच पोलिसांशी झटापट करत मारहाण केली.

यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी पोलीस पथकाच्या स्वसंरक्षनार्थ आरोपी इसम प्रताप ऊर्फ बाळा हनुमंत पवारच्या दिशेने झाडलेली गोळी त्याच्या उजव्या पायाच्या पंजावर लागून तो जखमी झाला आहे, असे फिर्यादीत म्हंटले आहे. पोलीसांनी वरील सर्व तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुध्द भा.द.वि.कलम 307,353,332,34 तसेच भारतीय हत्यार कायदा सन 1959 चे कलम 3/25 व 28 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

जामखेडमधील खर्डा चौक हा गुन्हेगारांचा मोठा वावर असल्याबद्दल कुप्रसिद्ध आहे. या परिसरात अनेक अवैध व्यवसाय सुरू असल्याने सामान्य नागरिकांना आणि व्यावसायिकांना अनेकदा त्रासाला सामोरे जावे लागते. अनेक राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी येथील अवैध व्यवसाय उखडून टाकण्यासाठी आंदोलने केली आहेत. बीड आदी भागातील वॉन्टेड गुन्हेगार जामखेड परिसरात वास्तव्यास असल्याचे अनेकदा पोलीस कारवाईत दिसून आले आहे. पोलिसांनी अशा गुन्हेगारांवर कडक कारवाईची आता मागणी होऊ लागली आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT