Jalgaon News : Uddhav Thackeray  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Politics : महापुरुषांच्या पुतळ्यांवरून जळगावात राजकारण तापलं; स्थगिती असतानाही उद्धव ठाकरेंच्या हस्ते अनावरण...

Uddhav Thackeray Group News : "पुतळा अनावरण पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार उद्धव ठाकरे यांच्याच हस्ते करण्यात येईल. "

कैलास शिंदे

Jalgaon News : जळगावात छत्रपती शिवाजी महाराज व सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याच्या अनावरणाबाबत शासनाने स्थगिती दिल्यानंतरही आता पेच कायम आहे. परंतु उद्या रविवारी (ता. १०) पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण होईल, अशी ठाम भूमिका शिवसेनेचे जिल्हासंपर्क प्रमुख संजय सावंत यांनी जाहीर केली आहे. (Latest Marathi News)

जळगाव येथे आज सकाळी हॉटेल के. पी. प्राईड येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, महापालिकेतील गटनेते नितीन लढ्ढा, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, गजानन मालपुरे आदी उपस्थित होते.

संजय सावंत म्हणाले, "आम्ही जिल्हा पोलिस अधीक्षकांशी बैठक घेतली, त्यावेळी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यांबाबत महापौर, उपमहापौर यांच्या माध्यमातून आयुक्तांनी शासनाशी केलेला पत्रव्यवहार, तसेच आयुक्तांनी राजशिष्टाचाराबाबत पुणे-मुंबई येथे पत्रव्यवहार करून घेतलेली माहिती, तसेच त्यानंतर तयार झालेली कोनशिला याची संपूर्ण माहिती दिली आहे. विशेष म्हणजे शासनाच्या आवश्‍यक असलेल्या सर्व परवानग्या आम्ही पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे या पुतळ्यांच्या अनावरणाला स्थगिती देण्याची शासनाची कोणतीही गरज नव्हती.

प्रकरणाला राजकीय वळण

महापालिकेने पुतळा अनावरणासाठी सर्व परवानग्या जाहीर केल्या आहेत. त्यानंतरही जर शासन स्थगिती देत असेल, तर या प्रकरणाला राजकीय वळण दिले जात आहे, असा आरोपही सावंत यांनी केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनाच बोलवायचे असेल, तर राज्यात जे काही पुतळे बसविले जाणार आहेत, त्यांचे अनावरण त्यांनीच करावे, सर्व कार्यक्रमाची तयारी झालेली असताना नगरसेवक विरोध करतात, शासनाला पत्र जाते, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची तारीख व वेळ घेण्यासाठी कार्यक्रम स्थगित करण्याबाबत पत्र येते, त्यामुळे यातही मोठे राजकारण होत असल्याचे दिसून येत आहे.

पुतळा अनावरणाचा कार्यक्रम होणारच

"पुतळा अनावरण पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्याच हस्ते दोन्ही पुतळ्याचे अनावरण वेळेवर करण्यात येईल. आम्ही सर्व पक्षांच्या नगरसेवकांशी चर्चा केली, त्यांनी विरोध नसल्याचे सांगितले आहे. भाजप आमदार भोळे यांनीही पुतळा अनावरणास विरोध नसल्याचे सांगितले आहे. तसेच ज्या नगरसेवकांनी पत्र दिले आहे, त्यांच्यासह सर्वांनी कार्यक्रमाला यावे, अशी आपलीही विनंती आहे, असे सावंत म्हणाले.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT