BJP Maharashtra news : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अखेर आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आणि प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत तनपुरेंचा पक्षप्रवेश पार पडला.
प्रवेशानंतर त्यांनी पक्षाकडून योग्य जबाबदारीची अपेक्षा व्यक्त केल्याने त्यांना विधान परिषद निवडणुकीची उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक बळावली आहे.
दरम्यान, प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करत असतानाच राहुरीतील त्यांच्या संपर्क कार्यालयातही मोठे बदल दिसून आले. कार्यालयाच्या भिंतीवर झळकणारे शरद पवार आणि इतर राष्ट्रवादी नेत्यांचे फोटो हटवण्यात आल्याचे समोर आले आहे. लवकरच या ठिकाणी भाजप नेत्यांचे फोटो आणि पक्षाचे झेंडे झळकणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे.
प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप (BJP) प्रवेशानंतर राहुरी तालुक्यातील समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. राहुरी मतदारसंघाच्या विकासासाठी आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षांसाठी प्राजक्तदादांनी हा निर्णय घेतला आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, अशी प्रतिक्रिया अनेक कार्यकर्त्यांनी दिली.
तनपुरेंचे समर्थक याही पुढे जाऊन दावा करत आहेत की, प्राजक्तदादांची विचारधारा सुरुवातीपासूनच हिंदुत्ववादी राहिली आहे. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीवेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाला मान देत संयमाची भूमिका घेतली होती. भाजपचा उमेदवार विजयी होण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यामुळेच आता त्यांना योग्य राजकीय संधी मिळणे स्वाभाविक आहे.
भाजप प्रवेशानंतर तनपुरे यांना विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी निश्चित असल्याच्या चर्चांनाही वेग आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अजून दोन दिवसांचा अवधी शिल्लक असल्याने पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे. तनपुरेंना उमेदवारी मिळाल्यास त्यांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार मैदानात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राहुरीच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणाऱ्या या पक्षप्रवेशामुळे महाविकास आघाडीला आणखी एक धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आता भाजप तनपुरेंना कोणती राजकीय जबाबदारी देते आणि विधान परिषदेसाठी त्यांच्यावर शिक्कामोर्तब होते का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.