Prajakt Tanpure reacts to Sharad Pawar family connection Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Prajakt Tanpure on Sharad Pawar : चर्चांना उधाण! शरद पवार कुटुंबाशी नात्यावर भाजप उमेदवार प्राजक्त तनपुरेंचं महत्त्वाचं विधान

Prajakt Tanpure on Sharad Pawar family relations: शरद पवार राष्ट्रवादीला सोडून भाजपकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी करणारे प्राजक्त तनपुरे यांचे पवार कुटुंबियांच्या संबंधावर मोठं विधान केलं आहे.

Pradeep Pendhare

Maharashtra Legislative Council Election: अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शरद पवार कुटुंबाशी असलेल्या संबंधांबाबत महत्त्वाचे विधान केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या परिवाराशी आपले कौटुंबिक संबंध कालही होते, आजही आहेत आणि भविष्यातही कायम राहतील, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

माध्यमांशी संवाद साधताना तनपुरे म्हणाले की, शरद पवार (Sharad Pawar) परिवाराशी असलेले संबंध हे केवळ राजकारणापुरते मर्यादित नसून ते कौटुंबिक आणि भावनिक स्वरूपाचे आहेत. मोठे साहेबांविषयी माझ्या मनात आजही नितांत आदर आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाबद्दलचा सन्मान भविष्यातही कायम राहील, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.

भाजपमध्ये (BJP) प्रवेश केल्यानंतरही महाविकास आघाडीतील नेते आणि इतर पक्षांतील नेत्यांशी आपले वैयक्तिक संबंध चांगले असल्याचे तनपुरे यांनी सांगितले. राजकारणात मतभेद असू शकतात, पण वैयक्तिक संबंध कायम राहतात. कार्यकर्त्यांना योग्य सन्मान मिळावा आणि मतदारसंघातील विकासकामांना गती मिळावी, या उद्देशाने मी भाजपमध्ये प्रवेश केला, असे ते म्हणाले.

भाजपमध्ये प्रवेश करून विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्यानंतरही शरद पवार कुटुंबाशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध कायम राहतील, असा संदेश प्राजक्त तनपुरे यांनी दिल्याने अहिल्यानगरच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. भाजपच्या उमेदवारीसोबतच पवार कुटुंबाबद्दल व्यक्त केलेला आदर आणि सर्वपक्षीय नेत्यांशी संबंध कायम ठेवण्याची भूमिका यामुळे तनपुरेंची ही प्रतिक्रिया विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.

भाजपने पक्षात प्रवेश दिल्यानंतर अवघ्या काही दिवसांत विधान परिषदेची उमेदवारी दिल्याबद्दल तनपुरे यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे, असे त्यांनी सांगितले.

सत्यजित कदमांची भेट घेणार

उमेदवारीसाठी इच्छुक असलेले भाजपचे देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांची लवकरच भेट घेणार असल्याचेही तनपुरेंनी स्पष्ट केले. उमेदवारीची इच्छा बाळगणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. पूर्वीही त्यांना सहकार्य करण्याची ग्वाही दिली होती. त्यामुळे त्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे, असे त्यांनी सांगितले. तनपुरे आणि कदम यांची संभाव्य भेट सध्या जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात तसेच भाजपच्या अंतर्गत चर्चांमध्ये विशेष उत्सुकतेचा विषय ठरत आहे.

अजित पवार राष्ट्रवादीच्या भूमिकेवर...

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून या निवडणुकीत वेगळी भूमिका घेतली जाईल का, याबाबत विचारले असता तनपुरे यांनी सावध प्रतिक्रिया दिली. त्या संदर्भात मला कोणतीही माहिती नाही. मात्र रविवारी चौंडी इथं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट झाली. त्यांच्या बोलण्यातून कोणतीही वेगळी भूमिका जाणवली नाही, असे त्यांनी सांगितले.

राऊतांच्या टीकेवर बोलण्यास नकार

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी तनपुरेंबाबत केलेल्या 'राजकीय श्रद्धांजली'च्या वक्तव्यावर तसेच शरद पवार गटाच्या पुढील भूमिकेवर भाष्य करण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT