Prajakt Tanpure Vs Karan Sasane : राणी लंके, सचिन जगताप, सत्यजित कदम यांची ऐनवेळी माघार, काँग्रेसचे ससाणे अन् राष्ट्रवादीचे पानसरे मैदानात; तनपुरेंविरुद्ध मविआची नेमकी चाल काय?

Congress vs NCP political contest in Rahuri: विधान परिषदेच्या अहिल्यानगर मतदारसंघाच्या अर्ज भरण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, लंके, जगताप, कदम यांनी निवडणुकीत अर्जच दाखल केले नाही.
Prajakt Tanpure vs Karan Sasane political battle
Prajakt Tanpure vs Karan Sasane political battleSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Legislative Council Election: अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीचे चित्र, उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी स्पष्ट झाले.

महायुतीकडून भाजपचे उमेदवार म्हणून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अर्ज दाखल केला असताना, महाविकास आघाडीने अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र काँग्रेसचे श्रीरामपूर नगराध्यक्ष करण ससाणे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

या निवडणुकीसाठी एकूण पाच उमेदवारांचे आठ अर्ज दाखल झाले आहेत. प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी चार उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. त्यांच्याशिवाय करण ससाणे, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीगोंद्यातील नेते दत्तात्रय पानसरे, शेवगावचे कमलेश गांधी आणि अकोल्यातील मच्छिंद्र धुमाळ यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत.

महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (Sharad Pawar NCP) माजी जिल्हा परिषद सदस्य राणी लंके या उमेदवार असतील, अशी रविवारी जोरदार चर्चा होती. स्वतः राणी लंके यांनीही सोशल मीडियावरून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. त्या अर्ज दाखल करण्यासाठी अहिल्यानगर शहरातही दाखल झाल्या होत्या.

मात्र, ऐनवेळी त्यांनी अर्ज दाखल न करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, खासदार निलेश लंके यांच्या समर्थकांपैकी एकही कार्यकर्ता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे फिरकला नाही. त्यामुळे लंके गटाने शेवटच्या क्षणी माघार घेतल्याची चर्चा रंगली आहे.

Prajakt Tanpure vs Karan Sasane political battle
Sangram Jagtap NCP : महायुतीतच धुसफूस; राष्ट्रवादीच्या हातातली जागा गेली, दिग्गज भाजपसमोर जगताप समर्थकांची नाराजी कितपत टिकणार?

महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे दीप चव्हाण यांचेही नाव चर्चेत होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दीप चव्हाण आणि करण ससाणे हे दोघेही संभाव्य उमेदवार असल्याचे संकेत दिले होते. मात्र, दिवसभर वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असतानाही दीप चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.

परिणामी, सध्या तरी करण ससाणे हेच मविआकडून संभाव्य उमेदवार मानले जात आहेत. त्यांनी अर्ज अपक्ष म्हणून भरला असला, तरी अंतिम क्षणी महाविकास आघाडी त्यांना अधिकृत पाठिंबा देण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

Prajakt Tanpure vs Karan Sasane political battle
Ahilyanagar Mahayuti Politics : मंत्री विखेंनी काढली जगताप समर्थकांच्या नाराजीची हवा; तनपुरेंच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीच्या नाराजीचे वादळ पेल्यातच?

महायुतीतील नाराजीचा सूरही कायम

या निवडणुकीत अजित पवार राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप हे महायुतीकडून इच्छुक होते. त्यांनी तयारीही सुरू केली होती आणि उमेदवारी अर्जही घेतला होता.

मात्र, त्यांनी अखेर अर्ज दाखल केला नाही. प्राजक्त तनपुरे यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संग्राम जगताप समर्थकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे महायुतीत अंतर्गत धुसफूस असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

निष्ठावंतांचा मुद्दा तापवणाऱ्यांनी अर्ज भरलाच नाही

दरम्यान, भाजपचे देवळाली प्रवरा नगराध्यक्ष सत्यजीत कदम यांनीही निष्ठावंतांना संधी द्यावी, अशी भूमिका घेत अर्ज उचलला होता. विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनीदेखील पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, कदम यांनीही अखेर अर्ज दाखल न करण्याचा निर्णय घेतला.

दत्तात्रय पानसरे यांच्या अपक्ष अर्जाची चर्चा

सचिन जगताप यांनी माघार घेतली असली तरी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीगोंद्यातील प्रभावी नेते दत्तात्रय पानसरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून राजकीय समीकरणात नवा ट्विस्ट निर्माण केला आहे. त्यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

4 जून निर्णायक

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 4 जून आहे. त्याच दिवशी निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. महायुतीकडून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडी शेवटच्या क्षणापर्यंत कोणती रणनीती आखते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

तनपुरेंविरुद्ध ससाणे सामना

सध्याच्या घडीला भाजपचे प्राजक्त तनपुरे विरुद्ध काँग्रेसचे करण ससाणे, असा सामना होण्याची शक्यता सर्वाधिक मानली जात आहे. महायुतीकडे संख्याबळाचा स्पष्ट फायदा असला तरी मविआ निष्ठावंतांचा मुद्दा आक्रमकपणे पुढे रेटू शकते. त्यामुळे निवडणूक प्रत्यक्ष झालीच, तर ती केवळ औपचारिक न राहता राजकीयदृष्ट्या चुरशीची आणि रंगतदार ठरण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com